भोळ्या भावामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भगवंतालाच पहाणार्‍या अन् अखंड भावावस्थेचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

भोळ्या भावामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भगवंतालाच पहाणार्‍या अन् अखंड भावावस्थेचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या डोंबिवली, ठाणे येथील सनातनच्या ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी (वय १०० वर्षे) !

२६.११.२०१८ या दिवशी डोंबिवली (जिल्हा-ठाणे) येथील सौ. कपिला घाणेकर (सनातनच्या संत पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटील यांची नात, मुलीची मुलगी) यांच्या निवासस्थानी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. पाटीलआजी यांची मुलाखत घेतली. त्यांच्या संवादामधून पू. पाटीलआजींचे भगवंतमय झालेले भावविश्‍व आणि त्यांची अखंड भावावस्था यांचे दर्शन होते. १५ एप्रिलला आपण या मुलाखतीचा काही भाग पाहिला. आज अंतिम भाग पाहूया.

या मुलाखतीचा पूर्वार्ध पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/468684.html

पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी

५. पू. आजींचे वय १०० वर्षे असूनही त्यांनी स्वतःची कामे स्वतःच व्यवस्थितपणे करणे

कु. प्रियांका लोटलीकर : आजींचे वय आता किती आहे ?

सौ. कपिला घाणेकर : शंभरच्या आसपास असेल !

कु. प्रियांका लोटलीकर : अजूनही त्या स्वतःची कामे स्वतःच करतात ना ?

सौ. कपिला घाणेकर : हो. त्यांना इतरांना त्रास द्यायला आवडत नाही. त्यांना रात्री उठावे लागल्यास कुणी गाढ झोपलेेले असेल, तर त्या कुणालाच उठवत नाहीत. त्या म्हणतात, ‘‘देव आहे.’’ त्या भिंतीला धरत धरत एकट्याच व्यवस्थित जातात आणि दिवा बंद करून परत येऊन झोपतात. आपण जागे असलो, तर ‘मला जरा नेशील का ?’, असे विचारतात. पू. आजींच्या सर्व गोष्टी सहज असतात. त्यांना काही सांगावे लागत नाही. त्या स्वतःची कामे करतात, हे शिकण्यासारखे आहे. या वयातही त्या स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवतात. केस विंचरतात. कुठे काही वस्तू पडलेल्या असल्या, तर त्या उचलून ठेवतात. त्या दैनिकाची व्यवस्थित घडी घालतात आणि पलंगावरील चादरही व्यवस्थित घालतात.

मुलाखत घेतांना १. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर आणि समोर बसलेल्या पू. पाटीलआजी, समवेत सौ. कपिला घाणेकर (पू. आजींची नात)

६. पू. आजींना घराच्या बाहेर होत असलेले देवदर्शन !

६ अ. पू. आजींना खिडकीतून बाहेर पाहिल्यावर सगळीकडे देवतांचे दर्शन होणे आणि त्यांना काळोखातही देव दिसणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, खिडकीतून बाहेर बघितल्यावर तुम्हाला काय दिसते ?

पू. आजी : तेथे देवता आहेत. त्या बघा, समोर पाण्यात देवता चालत आहेत; पण त्यांना अन्न नाही. पाणी नाही. त्यांना पाहून मला पुष्कळ वाईट वाटते.

कु. प्रियांका लोटलीकर : देवता दिवसभर असतात का ?

पू. आजी : त्या दिवसा आणि रात्रीही असतात.

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला देवता रात्रीही दिसतात ? प्रकाश दिसतो का ?

पू. आजी : आता काळोख पडला असता, तर मी तुम्हाला देवता दाखवल्या असत्या. त्या मला काळोखातही दिसतात.

६ आ. पू. आजींना रात्रंदिवस गंगेत उभ्या असलेल्या देवता दिसणे, घराची खिडकी उघडल्यावर इमारती आणि झाडे यांच्या जागी देवताच दिसणे

कु. प्रियांका लोटलीकर : देवता बोलतात का ?

पू. आजी : बोलत नाहीत. मी इथूनच त्यांचे दर्शन घेते. त्या किती दूर आहेत ! आणि ती गंगा आहे. देवता गंगेत उभ्या आहेत. मी त्यांना येथूनच नमस्कार करते. त्या माझ्याकडे पहातात. मी त्यांना नमस्कार करते आणि म्हणते, ‘नमस्कार आई ! पूर्ण रात्र आणि दिवस तुम्ही नदीत उभ्या असता. तुम्हाला तहान-भूक काही लागत नाही का ? मी तुम्हाला काही खातांना पाहिले नाही. मी इथेच बसलेली असते. सकाळी उठल्यापासून नामजप करते. कंटाळा आला की, नामजप करायचा बंद करते. मी रात्री झोपेपर्यंत नामजप करते. मला झोप लागते, तेव्हा नामजप बंद होतो.’

कु. प्रियांका लोटलीकर : प्रत्यक्षात आपण घराची खिडकी उघडली की, आजींना समोरच्या इमारतींमध्ये गंगा नदी दिसते आणि गंगेत देवता उभ्या असल्याचे दिसते. म्हणजे तिथे ‘इमारती आहेत, झाडे आहेत’, असे त्यांना दिसत नाही. त्या ठिकाणी देवताच दिसतात.

७. संतपद प्राप्त होईपर्यंत पू. आजींना वातावरणामध्ये अनिष्ट शक्ती दिसणे, त्यांनी अनिष्ट शक्तींना ‘साधक’, असे म्हणणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींना भिंतीवर देव दिसतात. त्यांना कधी वातावरणामध्ये अनिष्ट शक्तीही दिसल्या आहेत का ?

सौ. कपिला घाणेकर : सध्या आजीला अनिष्ट शक्ती दिसल्या नाहीत; पण यापूर्वी पुष्कळ वेळा दिसल्या आहेत. तेव्हा आजी अनिष्ट शक्तींना घाबरायची. तिची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर तिला पुष्कळ अनिष्ट शक्ती दिसत होत्या. आता संत झाल्यावर त्या दिसणे न्यून झाले आहे. साधारण एक ते दीड मासापासून आजीची अशी स्थिती आहे. आता तिला सर्वत्र देवच दिसत आहे. आता ती आनंदी आहे. आता ती अनिष्ट शक्तींनाही ‘साधक’च म्हणते. आम्ही घाबरू नये; म्हणून ती म्हणते, ‘‘त्यांचे नाव कशाला घ्यायचे ? ‘साधक’ आला वाटते. तो साधकच आहे. आपण त्यालाही नामजप करायला सांगूया.’’ प्रत्यक्षात ती अनिष्ट शक्ती असते.

८. पू. आजींनी बलराम आणि श्रीकृष्ण यांच्याशी भावावस्थेत असतांना केलेले संभाषण !

पू. आजी (पुष्कळ हसत) : तुम्ही आहात कुठे ? ‘राधा-श्रीकृष्ण, राधा-श्रीकृष्ण’ देवा, तुम्ही एके ठिकाणीच खेळा. मारामारी करू नका. बलराम नि तू श्रीकृष्णा, तुम्ही खेळत रहा. तुमचा खेळ चांगला चालतो. हे पहा, गुरु आहेत. गुरु आहेत ना ? हे बघा. तुमच्यासाठी आहेत देव. देवा, मी कृतज्ञ आहे. देवा, किती शोधते मी ? माझ्या आवडीची लहान बाळे आहेत ना ही ? ती लहान आहेत. ती कुठे जाणार ? देवा, मीच जाते तुम्हाला टाकून. राधा-श्रीकृष्ण (पू. आजी रडत आहेत.) ‘राधा-श्रीकृष्ण, राधा-श्रीकृष्ण’ (नामजप करत आहेत.) श्रीकृष्ण आणि बलराम मस्ती करतात ? नाही करत. दोघे खेळतात ना ! मस्ती करत नाहीत. माझी मुले शांत आहेत. गुरु आहेत ना ! मला आठवण आली की, हे दोघे धावत येतात. मी त्यांना मिठीत घेते. ते दोघे लहान आहेत; म्हणून मला भीती वाटते. ‘बाबा, कुठे जाऊ नका. चांगले रहा’, असे सांगून मी जाते. ‘माझी ही बाळे काही करत नाहीत. किती दिवस भेटतही नाहीत. शहाणी आहेत माझी बाळे ! मला सेवा असते ना ! आता मी तुमच्याजवळच राहीन.’

९. पू. आजींचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला उत्कट भाव

९ अ. पू. आजींनी ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वांचे रक्षण करतात’, हे कृतज्ञताभावाने सांगणे

पू. आजी : गुरुदेवा, राधा, श्रीकृष्ण, बलराम, राधाजी कृष्ण ! एवढ्या बाळांवर लक्ष ठेवता ना ? मला ठाऊक आहे, तुमचे त्यांच्यावर लक्ष असते. तुम्हीच त्यांचा सांभाळ करता. बाळेच आहेत ती. चांगली आहेत. कळ काढत नाहीत. हसतात आणि खेळतात. तो बघा श्रीकृष्ण हसत आहे. शहाणी गं बाळे. किती खेळतात ना ? मजा वाटते, ती खेळायला लागली की ! गुरुदेवा, तुम्ही एवढ्या सर्वांचे रक्षण करता ना ? त्यांच्यावर तुमचीच दृष्टी आहे. तुम्हीच त्यांचा सांभाळ करता. मी त्यांना तुमच्यावर सोडून बाहेर जाते. ‘नाचती वैष्णव वाणी रे, नाचती वैष्णव वाणी रे । देवा, हा छोटाच अभंग आहे. राधा-श्रीकृष्ण म्हणतात, ‘तुला दम लागतो ना; म्हणून छोटा अभंग दिला आहे.’ त्यांना चिंता असते. मला एकही मोठा अभंग दिलेला नाही. बाळा, काय पाहिजे तुला ? खाऊ पाहिजे ? मग गुरूंच्या जवळ मागायचा ना ? ते आणून देतात.

९ आ. परात्पर गुरु डॉक्टर पू. आजींना पाठवत असलेल्या खाऊविषयी त्यांना कृतज्ञता वाटणे आणि साधिकेने ‘परात्पर गुरुदेवांनी आताही तुम्हाला खाऊ पाठवला आहे’, असे म्हटल्यावर त्यांची भावजागृती होणे

कु. प्रियांका लोटलीकर : आजी, तुम्ही परात्पर गुरु डॉक्टरांनाही भेटलात ना ? त्यांनी तुम्हाला खाऊ आणि आंबे पाठवले होतेे ना ! तुम्ही ते खाल्ले का ?

पू. आजी : हो. मी खाल्ले. मी देवाला म्हणाले, ‘देवा, परात्पर गुरुदेवांनी आंबे दिले आहेत. एकदा खोका भरून मिठाई दिली. काय काय होते त्यात ? चिवडा, पेढे आणखी काही काही ! ते नेहमी देतात. मुले लांब असली की, आपण कसे त्यांना खायला देतो ना, तसे ते मला देतात. (पू. आजींची भावजागृती होते) का बरे देत असतील ?’

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, परात्पर गुरुदेवांनी आताही तुम्हाला खाऊ पाठवला आहे.

पू. आजी : बघा, ते असे देतात. त्यांना कशी आठवण असते पहा ! ते का बरे खाऊ देतात ? मी सांगते, ‘देवा, परम पूज्य देवा, मला तुमचा मिठाईचा खोका मिळाला. तुम्ही माझ्यासाठी साधकांजवळ अनेक वेळा मिठाईचा खोका दिला आहे. तुम्ही दिलेला खाऊ मला मिळाला. देवा, मी तो खाऊ खाल्लाही. तुम्हाला आमच्याविषयी पुष्कळ माया आहे. तुम्ही पेटी भरून आंबे दिले होतेे.’

सौ. कपिला घाणेकर : आजी, बघ, काय काय दिले आहे ? सगळे आवडीचे दिले आहे ना आणि ही मिठाईही दिली आहे.

पू. आजी : सगळं माझ्या आवडीचे दिले आहे. तू म्हणतेस ना, ‘‘तुला चावायला दात नाहीत ना; म्हणून तुला मऊ खाऊ दिला आहे. सोनपापडी दिली आहे.’’ ‘देवा, मी ती तोंडात टाकली की, लगेच विरघळते. तुम्ही माझी किती काळजी घेता ! गुरुदेवांनी मनुकाही दिल्या आहेत. आपण सगळ्यांना वाटूया. अशी त्यांची माया आहे. नेहमी असेच देतात आणि अगदी भरपूर देतात.

९ इ. पू. आजींनी परात्पर गुरु डॉक्टरांना दर्शन देण्यासाठी विनवणे

कु. प्रियांका लोटलीकर : आजी, परात्पर गुरु डॉक्टरांना काय सांगायचे आहे ?

पू. आजी : मी त्यांना काय सांगणार ? ‘मला भेटायला या. मला दर्शन द्या’, असे सांगेन. मी सकाळी नामजपाला बसतांना बोलले होते, ‘देवा, मी नामजप करायला बसले आहे; पण मला तुमचे दर्शन होत नाही. आता मी नामजप करते. परम पूज्य गुरुदेवा, तुम्ही ते मिठाईचे पुडे देता ना, ते सर्व मला मिळतात हंं. मी तो खाऊ खाते. साधक माझी विचारपूस करतात. ते म्हणतात, ‘‘गुरुदेवांनी तुम्हाला खाऊ दिला आहे.’’ केवढी माया आहे गुरुदेवांची !’

सौ. कपिला घाणेकर : त्यांनाही आनंद होतो ना, तुला भेटल्यावर ?

पू. आजी : देवा, मला मिठाईचा पुडा मिळाला. तुम्ही अगदी आवडीने आणि आठवणीने खाऊ देता. देवा, ‘शबरीने श्रीराम येणार आहेत’, असे म्हणून तुमच्यासाठी बोरे आणून ठेवली होती. तेवढ्यात तुमची स्वारी तेथे आली. तुम्ही तेथे बसलात. राम, लक्ष्मण आणि सीता सर्व जण बसले होते. शबरीने काय केलेे ? बोर हातात घेऊन त्याचा चावा घेतला आणि गोड बोर देवाला भरवले. त्या वेळी लक्ष्मणाने काही खाल्ले नाही. श्रीराम बघत होते. लक्ष्मणाने बोर खाल्ले नाही. श्रीराम म्हणाले, ‘‘शबरीची तशी भक्ती आहे. मला तिच्या पुढे जाता येत नाही. मला हे उष्टे बोर खाल्लेच पाहिजे. ही एवढी मोठी भक्त आहे. माझी शबरी पुष्कळ मोठी आहे. तिने मला बोरे भरवली आणि मी ती उष्टी बोरे आनंदाने खाल्ली’’.

देवा, तुम्ही या कार्यक्रमाला या. मी वाट बघतेय तुमची. तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवलात, तर तुम्ही लांब राहू नका. इकडे या. देवा, मी वाट बघत आहे. मी नेहमीच तुमची वाट बघते. तुम्ही पाठवलेला सर्व खाऊ मी खाते. तुम्ही आवडीने देता, मग मीही आवडीने तो खाते. नमस्कार देवा !

९ ई. नातवाच्या नव्या सदनिकेत जातांना पू. आजी चार माळे चढून वर जाणे आणि त्यांनी ‘गुरूंनीच हाताला धरून वर नेले’, असे सांगणे

सौ. कपिला घाणेकर : माझ्या भावाने चौथ्या माळ्यावर नवी सदनिका घेतली. तेथे गणेशपूजन होते. आम्ही आजीला म्हणालो, ‘‘तू इथूनच नमस्कार कर; कारण तू कुणाला तुला उचलू देणार नाहीस आणि तुला चार जिने चढून त्रास होईल.’’ तेव्हा आजी म्हणाली, ‘‘मला तिकडे यायचेच आहे. माझे गुरु मला नेतील.’’ आम्ही तिला नेले, तर ती न थांबता चार जिने चढली. तिने खाली काही प्रार्थना केल्या. आम्ही दोघांनी दोन बाजूला धरून तिला वर नेले. तेव्हा ती वजनाने मला हलकी वाटली. ‘आम्ही ४ जिने कसे चढलो ?’, ते कळलेही नाही. ती ५ – १० मिनिटांच्या आत जिना चढून घरी जाऊन बसलीसुद्धा. आम्ही जेवून लगेचच परत निघालो, तर ती चार जिने उतरलीही. आजी, तेव्हा तुला गुरूंनीच धरले होते ना ?

पू. आजी : मला गुरूंनीच धरले होते. त्यांनी मला हाताला धरून वर नेले.

१०. पू. आजींचा कृतज्ञताभाव आणि अखंड भावावस्था !

सौ. कपिला घाणेकर : आजी सतत कृतज्ञता व्यक्त करते. वृद्ध लोकांना किती व्याधी आणि खाण्याचे पथ्य असते ना; पण आजीला कोणतेच पथ्य नाही, कसल्या व्याधी नाहीत आणि कसली गोळीही नाही.

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींचे भावविश्‍व किती छान आहे ना !

सौ. कपिला घाणेकर : आता दोन दिवसांपूर्वी ती अक्षरशः लोटांगण घालत होती. तिचे रडू थांबतच नव्हते. आजी सतत भावावस्थेत असते; पण ती एवढी भावावस्थेत कधीच नव्हती. ती एकदम निर्विकार आणि शांत होती. ती केवळ शरिराने इथे होती; पण तिचा आत्मा इथे नसावा. तो देवाशी एकरूप झाला असेल. ती पुष्कळ रडत होती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते.

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींकडून आपल्याला पुष्कळ शिकण्यासारखे आहे.’

(समाप्त)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या /साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक