परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील !

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या देवद आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील (वय ५२ वर्षे) ! 

देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील यांनी ४ जुलै २०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांच्याविषयी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. महानंदा पाटील

१. सातत्य आणि चिकाटी

‘कु. महानंदाताई यांचे प्रतिदिन व्यष्टी साधना आणि सेवा यांचे नियोजन ठरलेले असते. त्याचे त्या काटेकोरपणे पालन करतात. त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत कधीही खंड पडत नाही.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

२. व्यवस्थितपणा

महानंदाताई सात्विक उत्पादनांच्या सेवेतील अत्तराशी संबंधित सेवा करतात. तो भाग नेहमी नीटनेटका आणि आवरलेला असतो. तेथील सर्व वस्तू ठरवलेल्या जागी ठेवलेल्या असतात. तेथील वस्तूंच्या जागा कधीही पालटलेल्या आढळून येत नाहीत. त्यामुळे सात्विक उत्पादनांच्या सेवेतील अत्तराशी संबंधित सेवा जिथे चालते, त्या भागात अधिक चांगले वाटते. महानंदाताई यांच्यातील नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा आणि शिस्त यांमुळे त्या सेवा करत असलेल्या ठिकाणी चांगले वाटते.

३. मायेची आसक्ती नसणे

त्यांना नवीन कपडे किंवा खाणे-पिणे, या कशाचीही आसक्ती नाही. त्यांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. त्या अल्प दिवस घरी जातात. त्यांचा ओढा सेवा आणि साधना यांकडेच अधिक आहे. ‘त्या मायेपासून पूर्ण अलिप्त आहेत’, असे लक्षात येते.

४. गुरुसेवेची तळमळ

महानंदाताई त्यांची सेवा अत्यंत मनापासून, भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात. त्यांच्या सेवेत अचूकता असते. त्या सेवेतील सर्व कार्यपद्धतींचे काटेकोरपणे आणि गांभीर्याने पालन करतात. त्या त्यात कधीही सवलत घेत नाही. त्यामुळे त्यांची सर्व सेवा व्यवस्थित होते. त्यांच्यात सेवा अचूक करण्याविषयी पुष्कळ गांभीर्य आहे. त्या तिथे सेवा करणार्‍या अन्य साधकांकडूनही सर्व कार्यपद्धतींचे पालन करवून घेतात आणि त्यांच्याकडूनही भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करवून घेतात.

५. भाव

५ अ. कृतज्ञताभाव : त्यांना सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात बसण्याची संधी मिळाली होती. तेव्हा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले सर्व प्रयत्न ताईंनी अत्यंत मनापासून केले. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या आढावा सत्संगात बसण्याची आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली’ यासाठी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. तो कृतज्ञताभाव त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांतूनही प्रकट होतो.

६. श्री गुरूंप्रती असलेला भाव

एकदा सात्विक उत्पादनांची सेवा करणार्‍या साधकांच्या सत्संगात महानंदाताईंना भावप्रयोग सांगायला सांगितले होते. त्यांनी सांगितलेली भावार्चना करतांना तेथील प्रत्येक साधकाने ‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतच आहोत’, असे अनुभवले. अनेक साधकांच्या डोळ्यांन भावाश्रू आले. महानंदाताईंच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे.’

– (पू.) सौ. अश्‍विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक