Indian Fisherman’s Death In Pakistani Jail : पाकच्या कारागृहात भारतीय मासेमाराचा मृत्यू !

  • २ वर्षांत ८ भारतीय मासेमारांचा मृत्यू

  • शिक्षा भोगूनही १८० भारतीय अद्याप कारावासात

इस्लामाबाद (पाकिस्तान) : शिक्षा पूर्ण करूनही सुटका करण्यात न आलेल्या बाबू नावाच्या भारतीय मासेमाराचा पाकच्या कारागृहात २३ जानेवारीला मृत्यू झाला. बाबू याला वर्ष २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या २ वर्षांत ८ भारतीय मासेमारांचा पाकच्या कारागृहात मृत्यू झाला आहे, तर शिक्षा पूर्ण झालेले १८० भारतीय मासेमार पाकिस्तानच्या कारागृहातून सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. भारत सातत्याने या संदर्भातील सूत्र पाकिस्तानकडे मांडत आहे; मात्र पाककडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. (पाक भारताला कधीच साहाय्य करणार नाही, तर तो त्रासच देणार आहे, हे स्पष्ट आहे ! – संपादक)

दोन्ही देशांच्या कराराच्या कलम ५ नुसार दोन्ही देशांच्या सरकारांनी बंदीवानांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत त्यांची सुटका करणे आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणे आवश्यक आहे; मात्र पाकने हा करार अनेकदा मोडला आहे. (पाकने केलेले करार हे मोडण्यासाठीच असतात आणि भारत त्याचे मूर्खासारखे पालन करत असतो ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा प्रसंगी भारताच्या जागी इस्रायल असता, तर एव्हाना पाकचे काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको ! भारत इस्रायलकडून काही शिकलेलाच नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !