शहराच्या विकासात विकासकांचे मोठे योगदान ! – गणेश नाईक, वनमंत्री

उद्घाटनप्रसंगी डावीकडून गणेश नाईक, वसंत भद्रा, अश्विन पटेल आणि नवलकर

नवी मुंबई – शहराच्या विकासात विकासकांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी सीवूड (नेरूळ) येथे केले. ते ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे, बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष वसंत भद्रा, नवी मुंबई महापालिकेचे माजी विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, बी.ए.एन्.एम्.चे सचिव जिगर त्रिवेदी, भूपेंद्र शहा, कोषाध्यक्ष करण सबलोक, शैलेश पटेल, प्रवीण पटेल, हितेश गामी, महेश पटेल, झुबिन संघोई, ‘पॅराडाईज ग्रुप’चे मधू भतिजा, मनीष भतिजा, जितू सोनी आदी नामांकित बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रदर्शन २४ ते २७ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

गणेश नाईक पुढे म्हणाले की, विकासकांना भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण पुढाकार घेणार आहे. भविष्यात राज्यासह नवी मुंबई शहर प्रगतीपथावर येणार आहे.

नवी मुंबई आणि रायगड झपाट्याने विकसित होत आहे. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, सागरी मार्ग, पनवेल-बदलापूर बोगदा आदी महत्त्वांकाक्षी प्रकल्प चालू आहे. या मालमत्ता प्रदर्शनात नवी मुंबई आणि रायगड परिसरातील गृहप्रकल्पांचे सादरीकरण केले आहे. या प्रदर्शनात १५ लाखांपासून २५ कोटी रुपये किंमतीची असलेली घरे उपलब्ध असून घरांची नोंदणी करणार्‍यांसाठी ‘लकी ड्रॉ’ असल्याचे विकासक प्रतीक भद्रा यांनी सांगितले.