प्रतिनिधी – श्री. प्रीतम नाचणकर, कुंभमेळा

प्रयागराज, २५ जानेवारी (वार्ता.) – वस्तुस्थितीचा विपर्यास करून महाकुंभमेळ्याची अपकीर्ती करणे, साधनारत संतांची वृत्ते देण्याऐवजी लोकेषणाचा हव्यास असलेल्या कथित साधूंना प्रसिद्धी देणे, चटपटीत वृत्ते प्रसारित करून कुंभमेळ्याच्या धार्मिकतेवरून लक्ष हटवणे, अशा प्रकारे हिंदूंच्या या भव्य मेळ्याची अपकीर्ती करणारी मोठी यंत्रणा प्रसारमाध्यमे, तसेच सोशल मीडिया यांद्वारे कार्यरत आहे. ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’, ‘यूट्यूब’ आदींवर कुंभमेळ्याला अपकीर्त करणारे अनेक संदेश, व्हिडिओ ज्या प्रकारे प्रसारित केले जात आहेत, त्यावरून हा प्रकार नियोजनबद्ध चालू असण्याची दाट शक्यता आहे.
१. काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यातील सेक्टर १९ मध्ये कुंभमेळा अंधश्रद्धा असल्याचा उघडपणे प्रसार करणार्या नास्तिकतावाद्यांना नागा साधूंनी चोप देऊन पिटाळून लावले होते.
२. कुंभमेळ्याला अपकीर्त करण्यासाठी आलेल्या या मंडळींना उघडपणे काम करता येत नसल्यामुळे ही सर्व मंडळी स्वत:ची ओळख उघड न करता सामाजिक माध्यमांवरून सक्रीय झाल्याचे दिसत आहेत.
३. कुंभमेळ्यातील आखाड्यांमध्ये काही ‘यूट्यूब’ चॅनलवाले आढळत आहेत. कुंभमेळ्यातील साधू कसे भोंदू आहेत, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
४. काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यात काट्यांवर झोपणारे ‘काटेवालेबाबा’ अशी ओळख असलेल्या एका साधूंचा व्हिडिओ बनवण्यासाठी हुज्जत घालत असलेल्या मुलीचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. ही मुलगी काटेवालेबाबांशी ज्या प्रकारे असभ्यतेने बोलत होती, यावरून ती जणू सुपारी घेऊन कुंभमेळ्याची अपकीर्ती करण्यासाठी आल्याप्रमाणे दिसत होती.

५. मॉडलिंग करणार्या हर्षा रिचारीया या साध्वीप्रमाणे भगवे वस्त्र घालून कुंभमेळ्यात सहभागी झाल्यावर ‘सर्वांत सुंदर साध्वी’ अशा प्रकारची उथळ वृत्ते, ‘आयआयटी बाबा’ असे नामकरण करून संन्याशी अभय सिंह यांना देण्यात येत असलेली उथळ प्रसिद्धी, जपमाळांची विक्री करणार्या मोनालिसा भोसले नामक युवतीच्या सुंदरतेच्या वृत्तांना वारेमाप प्रसिद्धी हे सर्व प्रकार कुंभमेळ्याच्या नियोजनबद्ध अपकीर्तीचे षड्यंत्र प्रदर्शित करत आहेत.