Hindu Code Of Conduct : काशी विद्वत परिषदेने ३५१ वर्षांनंतर सिद्ध केली ‘हिंदु आचारसंहिता’ !

  • महाकुंभामध्ये शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि संत करणार संमत

  • महाकुंभात १ लाख प्रती वितरित करण्यात येणार

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभात काशीच्या विद्वानांनी सिद्ध केलेली ‘हिंदु आचारसंहिता’ शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि संत यांनी संमत केल्यानंतर लोकांपर्यंत पोचवली जाईल. ३१ जानेवारीनंतर कधीही या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. काशी विद्वत परिषदेच्या पथकाने १५ वर्षे धार्मिक शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर ही आचारसंहिता सिद्ध केली आहे. ३०० पानांच्या आचारसंहितेत हिंदु समाजातील वाईट गोष्टींसमवेतच विवाह व्यवस्थेच्या संदर्भातही नियम सांगण्यात आले आहेत. ३५१ वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदूंसाठी अशी आचारसंहिता सिद्ध करण्यात आली आहे.

१. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महासचिव स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, ११ वर्षांच्या वैचारिक अभ्यासानंतर आणि धार्मिक ग्रंथांच्या ४ वर्षांच्या अभ्यासानंतर, देशभरातील विद्वानांच्या पथकाने काशी विद्वत परिषदेच्या सहकार्याने ती सिद्ध केली आहे. महाकुंभात प्रारंभ होणार्‍या संत परिषदेत, शंकराचार्य, महामंडलेश्‍वर आणि संत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करतील अन् देशातील लोकांना हिंदु आचारसंहिता स्वीकारण्याची विनंती करतील.

२. मौनी अमावास्येनंतर महाकुंभमेळ्यात वाटण्यासाठी पहिल्यांदाच हिंदु आचारसंहितेच्या एक लाख प्रती छापण्यात येणार आहेत. यानंतर देशभरात ११ सहस्र प्रती वितरित केल्या जातील.

स्मृती आणि पुराण यांना आधार बनवण्यात आला, ४० बैठका झाल्या !

हिंदु आचारसंहिता कर्म आणि कर्तव्याभिमुख करण्यात आली आहे. यात मनुस्मृति, पराशर स्मृति आणि देवल स्मृति यांना आधार म्हणून घेऊन, स्मृतींसह, श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि पुराण यांचे महत्त्वाचे भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. ७० विद्वानांच्या ११ संघ आणि तीन उप-संघ यांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक संघात उत्तर आणि दक्षिणेकडील प्रत्येकी ५ विद्वान होते. ४० बैठकांनंतर आचारसंहितेचे अंतिम प्रारूप सिद्ध करण्यात आले.

काय आहे ‘हिंदु आचारसंहिते’त ?

काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस प्रा. राम नारायण द्विवेदी म्हणाले की, मनु, पराशर आणि देवल स्मृति यांच्यानंतर ३५१ वर्षे हिंदु आचारसंहिता सिद्ध झाली नाही किंवा त्यात सुधारणा झाली नाही. नवीन संहितेत अंत्यसंस्काराच्या मेजवानीची संख्या देखील निश्‍चित करण्यात आली आहे. लग्नांमध्ये होणारा अनावश्यक खर्च थांबवण्यासह, वैदिक परंपरेनुसार दिवसा विवाह करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लग्नात कन्यादानाव्यतिरिक्त, हुंडा पूर्णपणे निषिद्ध असल्याचे म्हटले आहे.