
उड्डपी (कर्नाटक) – गेल्या अनेक वर्षांपासून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे नियमित वाचन आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण करणार्या, तसेच भगवंतावर असीम भक्ती आणि श्रद्धा ठेवणार्या कोटेश्वर येथील श्रीमती लक्ष्मीदेवी पै (वय ८२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, अशी घोषणा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा यांनी केली. श्रीमती पै यांच्या निवासस्थानी १८ जानेवारी २०२५ या दिवशी झालेल्या एका सत्संगामध्ये ही घोषणा करण्यात आली.
प्रारंभी अनौपचारिक संवाद साधत पू. रमानंद गौडा यांनी श्रीमती लक्ष्मीदेवी पै यांचा परिचय करून देत त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, ‘‘वृद्धापकाळातही भगवंताचे सतत चिंतन करणे, कर्तृत्व भगवंताकडे अर्पण करणे, कुटुंबियांना प्रेमाने आधार देणे, अशा दैवी गुणांमुळे त्यांची साधना उत्तमरित्या चालू आहे. त्यामुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’’
या वेळी श्रीमती लक्ष्मीदेवी पै यांचा मुलगा, सून, नातवंडे, तसेच नातवाची पत्नी आणि सनातनच्या धर्मप्रचारक सौ. मंजुळा गौडा उपस्थित होत्या.
यानंतर पू. रमानंद गौडा यांनी श्रीमती लक्ष्मीदेवी पै यांना त्यांचा इष्टदेव श्री गणपतिचे चित्र आणि प्रसाद देऊन सत्कार केला.
श्रीमती लक्ष्मीदेवी पै यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘प्रत्येक प्रसंगात भगवंत आमच्याकडून सर्वकाही करवून घेतो, अशी ठाम श्रद्धा असेल, तर सर्व काही शक्य आहे.’’ त्यानंतर त्यांचा मुलगा आणि नातवंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.