कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या पलायनामध्ये कारागृहातील कर्मचार्‍यांचा हात असल्याचा अन्वेषण यंत्रणेला संशय

कुंपणच शेत खाते म्हणतात ते यालाच !

पणजी, १२ एप्रिल (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांनी पलायन करण्यामध्ये कारागृहातील काही कर्मचार्‍यांचा हात असल्याचा संशय अन्वेषण यंत्रणांना आहे. या प्रकरणी काही कर्मचार्‍यांना कह्यात घेतले जाण्याची शक्यता अन्वेषण यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून गतवर्षी ३ कैद्यांनी पलायन केले होते. त्यानंतर या कारागृहात अमली पदार्थाचा व्यवहार होत असल्याचे, तसेच कारागृहात भ्रमणभाष वापरला जात असल्याचे उघड झाले होते. यानंतरच्या कारवाईत कारागृह प्रशासनाने हे भ्रमणभाष संच कह्यात घेतले होतेे. त्यानंतर कैदी टायगर अन्वर याचा कारागृहातील ‘टिकटॉक’ व्हिडिओ प्रसारित (व्हायरल) झाल्यावर गदारोळ माजला होता. कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कारागृहातून गतवर्षी पसार झालेला बलात्कार प्रकरणातील आरोपी रामचंद्र यल्लप्पा याला गुन्हे अन्वेषण विभागाने १० एप्रिलला बेंगळुरू येथे कह्यात घेतले. कारागृहातून पलायन करण्यास कुणीही साहाय्य न केल्याचा दावा रामचंद्र यल्लप्पा याने केला आहे; मात्र अन्वेषण यंत्रणेला कारागृहातील कर्मचार्‍यांच्या विरोधात मोठी माहिती मिळाली आहे.

पोलीस अधीक्षकांनी केलेल्या शिफारसींकडे दुर्लक्ष !

टायगर अन्वर याचा कारागृहातील ‘टिकटॉक’ व्हिडिओ प्रसारित झाल्यावर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक सोबित सक्सेना यांनी कारागृह प्रशासनाला काही शिफारसी केल्या होत्या. यामध्ये कारागृहात भ्रमणभाषसाठी चार्जिंग पॉईट असल्यास ते काढणे, कारागृहात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, विजेची योग्य प्रमाणात सोय उपलब्ध करणे आदींचा यात सहभाग होता. अमली पदार्थासारखी वस्तू कुणालाही कारागृह संकुलात टाकता येऊ नये, यासाठी उपाययोजना करा, कठड्याची उंची वाढवा, अशाही शिफारसी केल्या होत्या; मात्र कारागृह प्रशासनाने यावर विचारही केला नाही.