पुणे विद्यापीठाच्या पतपेढीमध्ये आर्थिक घोटाळे होत असल्याने संचालकांचा राजीनामा !

पतपेढ्यांमध्ये होणारे आर्थिक अपव्यवहार उघड होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे विद्यापिठातील पतपेढीमध्ये होणार्‍या अपव्यवहाराविषयी तक्रार करूनही त्यावर कोणतीच कारवाई न होणे हे गंभीर आहे. यामुळे या अपव्यवहारामध्ये सर्वजणच सहभागी आहेत का, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक सहकारी पतपेढी मध्ये आर्थिक अनियमितता निर्माण झाली आहे. ऑडिटमध्ये याविषयी शेरे लिहूनही याची चौकशी केली जात नाही, असा आरोप करत पतपेढीचे संचालक संतोष मदने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (अपव्यवहार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. अपव्यवहार लक्षात येणार्‍यांनीच राजीनामा दिल्यास अशा प्रकरणांचा छडा कोण लावणार ? – संपादक)

पुणे विद्यापिठात ३० वर्षांपासून सेवकांची पतपेढी आहे. यामध्ये वर्षाला ६ कोटी पेक्षा अधिक रकमेची उलाढाल होते. पतपेढीमधून कर्ज घेतलेल्या कर्मचार्‍यांनी कर्जाचे हप्ते भरले आहेत; मात्र त्याच्या नोंदी दुसर्‍यांच्या खात्यावर दाखवल्या जात आहेत. ज्या कर्मचार्‍यांचे कर्ज पूर्णपणे भरल्याचे प्रमाणपत्र दिले त्यांच्या खात्यावर थकबाकी दर्शवली जात आहे. पतपेढीमधील ४० खाती संशयास्पद आहेत. यामध्ये अर्थिक अनियमितताही दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पतपेढीचे पदसिद्ध अध्यक्ष कुलसचिव डॉक्टर प्रफल्ल पवार यांच्याकडे करण्यात आली; मात्र तक्रारींची दखल घेतली न गेल्याने या प्रकरणात न्याय मिळत नाही. विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या कष्टाच्या पैशावर ही पतपेढी उभी असून यात होणार्‍या अपव्यवहारांची चौकशी केली जात नसल्याने संतोष मदने यांनी राजीनामा दिला.

यावर पतपेढीतील व्यवहाराविषयी कुलसचिव यांनी खुलासा मागवला असून तो सादर केला जाईल, असे पतपेढीचे सचिव हेमंत खांदवे पाटील यांनी सांगितले.