८ लाख रुपयांच्या लाकूडसह मुद्देमाल जप्त
नंदुरबार – नवापूर तालुक्यातील खोकसा येथील २ घरांमध्ये अवैध लाकूड फर्निचरचा कारखाना चालू होता. या कारखान्यांवर नवापूर वन विभागाने धाड टाकून ८ लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा आणि फर्निचर जप्त केले आहे. ३ घंटे चाललेल्या या कारवाईने लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहे. (कायद्याचा धाक नसलेल्या समाजाला पालटण्यासाठी धर्मशिक्षणच आवश्यक ! – संपादक)
माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या पथकाने खोकसा गावातील चंदू गावित आणि रमेश गावित यांच्या घरी धाड टाकली. या वेळी सागवान नग, गोल आणि चौपट सागवान, असे एकूण ८ घनमीटरचा लाकुडसाठा, रंधा मशीन, २ डिजाईन यंत्र, असे एकूण ८ लाख रुपयांचे साहित्य मिळाले. धाड टाकण्यासाठी वन विभागाचा मोठा फौजफाटा आला होता.
अवैध लाकूडसाठा जप्त करून तो ५ ते ६ वाहनांमध्ये भरून नवापूर वन आगारात जमा करण्यात आला. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्करीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यात आंतरराज्यीय मोठ्या टोळीचा समावेश आहे. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकार्यांनी दिली. सागवान, सिसम, खैर, शिवण या लाकूडने फर्निचर सिद्ध करून त्याची महाराष्ट्रासह गुजरात राज्यात अवैधरित्या वाहतूक केली जात होती.