नवी देहली – येथील सर गंगाराम रुग्णालयातील ३७ डॉक्टरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता एम्स् रुग्णालयातील ३० डॉक्टरांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतरही त्याचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सर गंगाराम रुग्णालयातील ३२ डॉक्टर घरीच अलगीकरणात आहेत, तर ५ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
एम्स् रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी याविषयी साांगितले की, लस तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती देते. ती संक्रमणापासून बचाव करू शकत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसीची परिणामकारकता ७० ते ८० टक्के आहे. याचा अर्थ २० ते ३० टक्के लोक लस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित होऊ शकतात. अशा वेळी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी काळजी घेणे आवश्यक आहे.