![]() ‘कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या दळणवळणबंदीने लोकांचे जीवनमान पालटले आणि प्रत्यक्ष कामाची पद्धत ‘ऑनलाईन’ झाली होती. आजही ती पद्धत ‘वर्क फ्रॉम होम (घरी राहून काम करणे)’, अशी झाली आहे. प्रत्यक्ष कराव्या लागणार्या गोष्टी आता ‘ऑनलाईन’ सहजतेने होत आहेत. सनातनचेही अनेक उपक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाले होते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक या उपक्रमात जोडले गेले. या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते, तसेच सनातनचे हितचिंतक साधना करू लागले. एकंदरीतच हा काळ साधकांच्या साधनेसाठी, तसेच सनातनच्या कार्यवृद्धीसाठी पर्वणीच ठरला आहे.
१५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कोरोनाच्या काळात साधकांना व्यष्टी साधनेची घडी बसवता येणे आणि प्रत्येक जिल्ह्यात चालू झालेले ‘ऑनलाईन साधना सत्संग’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा पुढचा भाग देत आहोत. |
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/834216.html
४. श्रेणीनिहाय साधना सत्संग
४ आ. ‘ऑनलाईन’ साधना प्रवचन मालिकांना मिळालेला उदंड प्रतिसाद : ‘ऑनलाईन’ साधना सत्संग चालू करण्यापूर्वी संस्था स्तरावर कोरोना महामारीपूर्वी आणि कोरोनाच्या काळात जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंची नावे काढण्यात आली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिज्ञासूंची चांगला, मध्यम, सामान्य आणि अपरिचित अशी, तसेच त्यांच्या भाषेनुसार गटवारी करण्यात आली. यानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम् या ९ भाषांमध्ये सत्संग आरंभ करण्यापूर्वी ३ सप्ताह ऑनलाईन साधना प्रवचनमाला घेण्याचे निश्चित करण्यात आले. पहिली ऑनलाईन प्रवचनमाला ऑक्टोबर २०२० मध्ये झाली, तर नववी ऑनलाईन प्रवचनमाला मार्च २०२४ मध्ये झाली. या प्रवचनमालांचा आढावा पुढे दिला आहे.
जिल्ह्यांत जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंची (ग्रंथप्रदर्शनावर मिळालेले पत्ते, संकेतस्थळावरून मिळालेले संपर्क, सात्त्विक उत्पादने आवडल्याने दूरभाषद्वारे झालेले संपर्क, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे नवीन वाचक, गुरुपौर्णिमांना आलेले जिज्ञासू, अशा अनेक माध्यमांतून जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंची) माहिती एकत्रित करून त्यांच्यासाठी वर्षातून २ वेळा प्रवचनमालिका घेण्याची संस्थास्तरीय कार्यपद्धत विकसित झाली आहे. त्यामुळे कुठल्याही माध्यमातून जोडला गेलेला जिज्ञासू हा सत्संगप्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न चालू झाले. यातून सत्संगांची संख्या वाढत गेली.
४ इ. वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘वेबसाधना सत्संगा’स प्रारंभ : प्रतिमास वेबसाईटच्या (संकेतस्थळाच्या) वाचकांसाठी साधनेचे पुढील मार्गदर्शन करण्याची व्यवस्था नव्हती. यानुसार संकेतस्थळावर प्रतिमास जोडल्या जाणार्या जिज्ञासूंसाठी मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांत प्रतिसप्ताह ‘साधना संवाद’ उपक्रम चालू करण्यात आला. ‘संकेतस्थळावरील माहिती वाचून त्यांना काय आवडले ? ते सध्या काय साधना करतात ? साधनेच्या संदर्भात शंकानिरसन आणि संस्था अन् संस्थापक यांची माहिती’, अशा प्रकारच्या सूत्रांवर हा संवाद नियमित ४ भाषांमध्ये घेतला जातो. या संवादाची फलनिष्पत्ती, म्हणजे सध्या ७ सत्संग चालू असून ९५ जण साधक बनले आहेत. ४ ई. प्रत्यक्ष ‘साधना सत्संगां’ना आरंभ : कोरोनामुळे वर्ष २०२२ पर्यंत साधना सत्संग ऑनलाईन चालू होते. वर्ष २०२३ मध्ये नवीन भागात प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष सत्संग हा उपक्रम पुनश्च चालू करण्यात आला. या अंतर्गत सध्या ८२ गावांमध्ये प्रत्यक्ष साधना सत्संग चालू असून त्यांत १ सहस्र ६०० जिज्ञासू नियमित उपस्थित असतात.
५. कोरोना काळात विविध वर्गांसाठी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, या विषयावरील ऑनलाईन प्रवचने
५ अ. पत्रकारांसाठी आयाेजित ‘ऑनलाईन’ परिसंवादातून त्यांना मानसिक आधार मिळून तणावमुक्त जीवन जगण्याची दिशा मिळणे : कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात अडचणी आणि ताणतणाव होता. पत्रकारही त्यातून सुटले नव्हते. या कालावधीत अनेक पत्रकार आणि संपादक यांनासुद्धा नोकर्या गमवाव्या लागल्या. काही वृतपत्रे बंद झाली. काही जणांना दुसरीकडे अल्प वेतनात नोकरी करावी लागली. त्यातून अनेकांना निराशा आली होती. पत्रकार बंधूंना या तणावातून बाहेर काढून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ पत्रकार संवाद घेण्यात आले. महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांतील पत्रकारांसाठी एक अन् उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांतील पत्रकारांसाठी एक, असे २ परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. हे दोन्ही परिसंवाद शेकडो पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडले. त्यातून पत्रकारांना मानसिक आधार मिळाला, ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, याची दिशा मिळाली. या उपक्रमामुळे पत्रकारांशी जवळीक झाली. गेली ४ वर्षे हे पत्रकार सनातनच्या कार्याची प्रसिद्धी निःशुल्क करत आहेत.
५ आ. सनातनचे विज्ञापनदाते, अर्पणदाते, तसेच उद्योगपती यांच्यासाठी तणावमुक्तीची प्रवचने : कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे एक प्रकारे आर्थिक मंदीचे वातावरण होते. अनेक उद्योगपतींनी उद्योगधंद्यांमध्ये जी गुंतवणूक केली होती, ती एक प्रकारच्या आर्थिक हानीप्रमाणे होती. त्यामुळे उद्योगक्षेत्रातही नैराश्याचे वातावरण होते. सनातनशी अर्पण, विज्ञापन इत्यादी कारणांमुळे जोडले गेलेले उद्योगपती आणि व्यावसायिक यांच्यासाठी ठिकठिकाणी ऑनलाईन तणावमुक्तीची प्रवचने आयोजित करण्यात आली. अनेक उद्योगपतींनी या प्रवचनांनंतर नैराश्यावर मात करण्यासाठी स्वयंसूचना बनवून घेतल्या. अनेकांचा सनातनच्या साधकांशी साधनेच्या संदर्भात नियमित संपर्क चालू झाला.
५ आ १. ‘साधक गुरुकार्यासाठी समर्पित होऊन झोकून देऊन सेवा करत आहेत’, हे पाहून हितचिंतकांनाही त्यागाचे महत्त्व पटणे, अनेकांनी नेहमीपेक्षा अधिक साहाय्य करणे आणि अजूनही त्यांचा सक्रीय सहभाग असणे : या कालावधीत सनातनची कार्य करण्याची पद्धत पाहून ‘आश्रम कसे चालतात ? साधक कसे त्याग करून जीवन जगतात ? साधक गुरुकार्यासाठी समर्पित होऊन झोकून देऊन सेवा कशी करतात ? साधकांचा निरपेक्ष भाव’ या गोष्टी पाहून प्रभावित झालेले हितचिंतक उद्योगपती आणि व्यावसायिक यांनाही ‘आपण स्वत:चा धर्मकार्यातील सहभाग वाढवायला पाहिजे अन् त्याग करायला पाहिजे’, असे वाटले. अनेकांनी नेहमीपेक्षा अधिक आर्थिक किंवा अन्य प्रकारे योगदान दिले. प्रत्यक्ष कार्य चालू नसल्याने त्या वेळी गुरुपौर्णिमाही ‘ऑनलाईन’ घ्यावी लागली. त्या वेळी अडचणी असूनही सर्वांच्या प्रयत्नांमुळे नेहमीसारखेच निधीसंकलन झाले आणि विज्ञापने मिळाली. त्या काळापासून आजपर्यंत या सर्वांचा कार्यातील सहभाग चांगला आहे.
५ आ २. उद्योगपती सत्संग नियमित चालू होणे : तणावमुक्तीच्या प्रवचनानंतर मुंबई, पुणे, सोलापूर, गोवा, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि झारखंड या ठिकाणी उद्योगपतींचे सत्संग चालू झाले. हे सत्संग आजही नियमित चालू आहेत.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)
भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/838623.html