भोपाळमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल !

मुसलमान महिलेवर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार !

असा अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍या रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे !

प्रतिकात्मक चित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील सर्वांत मोठे रुग्णालय असलेल्या हमीदिया रुग्णालयामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे समोर आले आहे. येथे एका हिंदु युवकाने त्याच्या वहिनीचा मृतदेह समजून एका मुसलमान महिलेवर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे.

येथे शीलाबाई आणि नफीसा बी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबियांना मृतदेह नेण्यासाठी बोलावण्यात आले होते. शीलाबाई यांच्या दिराला मृतदेह दाखवून त्यांच्या कह्यात देण्यात आल्यावर त्यांनी त्यावर स्मशानात नेऊन अंत्यसंस्कार केले, तर दुसरीकडे नफीसा बी यांच्या मुलाला मृतदेह दाखवल्यावर तो तिच्या आईचा नसल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने शीलाबाईच्या दिराला बोलावल्यावर तो मृतदेह शीलाबाईचा असल्याचे उघड झाले. या घटनेमुळे दिराने नफिसा बी यांच्या मुलाची क्षमा मागितली, तर मुलाने पोलिसांत रुग्णालयाची तक्रार करणार असल्याचे सांगितले. रुग्णालयाने दोघा कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेन शुक्ला यांनी म्हटले की, नफिसा बी यांच्या अस्थी त्यांच्या मुलाला दफन करण्यासाठी देण्यात येतील.