हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या पत्नीला ६९ वर्षांनी मिळाले निवृत्ती वेतन !

सरकारी कार्यालयाची अक्षम्य चूक ! सैनिक देशासाठी स्वतःचे प्राणत्याग करतात; मात्र सरकारी कर्मचार्‍यांना त्याविषयी कोणतीही संवेदना नाही, हे लज्जास्पद आहे ! अशा चुका करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

नवी देहली – हुतात्मा झालेले गगन सिंह या सैनिकाच्या पत्नीला ६९ वर्षांनी निवृत्ती वेतन मिळाल्याची घटना समोर आली आहे. गगन सिंह कर्तव्यावर असतांना वर्ष १९५२ मध्ये त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांची पत्नी परुली देवी यांना पतीच्या निधनानंतर मिळणारे निवृत्ती वेतन मिळायला हवे होते; मात्र ते मिळाले नाही. भारतीय सैन्यदलानेही याची नोंद घेतली नाही. (भारतीय सैन्याकडून अशी असंवेदनशीलता अपेक्षित नाही ! – संपादक) निवृत्त अधिकारी डी.एस्. भंडारी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. सुमारे ६९ वर्षांनंतर परुलीदेवी यांना निवृत्ती वेतन मिळाले. भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार परुली देवी यांना वर्ष १९७७ पासून ४४ वर्षांच्या निवृत्ती वेतनाची थकबाकी सुमारे २० लाख रुपयांपर्यंत मिळेल.