पारादीप (ओडिशा) : भारतीय सागरी क्षेत्रात घुसून मासेमारी करणार्या ७८ बांगलादेशी मासेमारांना भारतीय तटरक्षक दलाने अटक केली आहे. या कारवाईच्या वेळी मासेमारी करणार्या २ नौकाही जप्त करण्यात आल्या. ‘एफ्.व्ही लैला-२’ आणि ‘एफ्.व्ही मेघना-५’ अशी या नौकांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी पारादीप बंदरावर नेण्यात आले आहे. भारताच्या समुद्रात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी मासेमारांच्या विरोधात ‘सागरी क्षेत्र कायदा १९८१’ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (भारतीय सीमेत घुसणार्या शत्रूराष्ट्रातील घुसखोरांना असा धडा शिकवला पाहिजे की, ते पुन्हा कधी भारताच्या सीमेत घुसण्याचे धाडस करणार नाहीत ! – संपादक)
भारतीय तटरक्षक दल गस्त घालत असतांना मासेमारी करणार्या २ बांगलादेशी नौका भारतीय सागरी क्षेत्रात घुसल्याचे दिसून आले. भारतीय तटरक्षक दलाने त्यांना पकडले. नौकांमधून एकूण ७८ जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही नौका बांगलादेशात नोंदणीकृत आहेत. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.