देशातील ५० टक्के कोरोनाबाधित रुग्ण असणार्‍या महाराष्ट्राला लसींचे वाटप अल्प प्रमाणात का ? – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई – आताच्या आकडेवारीनुसार एका आठवड्याला उत्तरप्रदेशला ४८ लाख, मध्यप्रदेशला ४० लाख, गुजरातला ३० लाख, तर हरियाणाला २४ लाख असे लसींचे वाटप झाले; मात्र देशातील ५० टक्के कोरोनाबाधित रुग्ण असणार्‍या महाराष्ट्राला केवळ ७ लाख ५० सहस्र लसींचे डोस दिले आहेत. महाराष्ट्राला अल्प डोस का ? असा प्रश्‍न राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लसीकरण यांवरून राज्यावर टीका केली होती. यावर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्तूस्थिती मांडली.

टोपे पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला देण्यात आलेल्या अल्प लसींविषयी मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकार्‍यांना सूचना देऊन तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आम्ही योग्य कार्यवाही होण्याची वाट पहात आहोत. आमच्याकडून सर्व पद्धतीने केंद्रशासनाशी समन्वय ठेवला जात आहे. महाराष्ट्रात ७ दिवसाला ४० लाख लसींचे डोस लागतात. त्यामुळे आठवड्याला ४० लाख आणि मासाला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत, तरच राज्यातील लसीकरण मोहीम व्यवस्थित चालू राहू शकेल.

८ एप्रिल या दिवशी सातारा, सांगली आणि पनवेल येथे लसीकरण बंद पडले. बुलढाणा येथे केवळ एक दिवसाचा साठा शेष आहे. आम्ही लसीकरण केंद्रेही वाढवली आहेत. मला कुणावर आरोप करायचे नाहीत. राज्यातील सर्व कर्मचारी, आधुनिक वैद्य, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र कष्ट करत आहेत. आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केली आहे. त्यानुसार लस पुरवावी, अशी आमची मागणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी कोरोनाविषयक कामगिरीविषयी महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. आम्ही पारदर्शीपणा पाळला आहे. अन्य राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे मला ठाऊक नाही. केंद्रशासनाच्या नियमानुसारच ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ आणि ‘अँटीजेन’ चाचण्या ७०-३० टक्के प्रमाणेच आम्ही करत आहोत. प्रति दक्षलक्ष १ लाख ९० सहस्र चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत.’’