आठवड्याच्या शेवटी घोषित केलेली दळणवळण बंदी कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशी प्रभावी नाही ! – केंद्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाला सूचना

केंद्रशासनाने तज्ञांची ३० पथके महाराष्ट्रात पाठवली

मुंबई – राज्यशासनाचे लक्ष दळणवळण बंदीवर न रहाता कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यावर असायला हवे. रात्रीची संचारबंदी आणि आठवड्याच्या शेवटी (‘वीक एंड’ला) घोषित करण्यात आलेली दळणवळण बंदी यांचा कोरोनाच्या संक्रमणावर फारच मर्यादित प्रभाव पडतो. आठवड्याच्या शेवटी घोषित केलेली दळणवळण बंदी कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशी प्रभावी नाही, असे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लिहिले आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रशासनाने ३० तज्ञांचे पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणते उपाय राबवणे आवश्यक आहे, याविषयी ही समिती काम करणार आहे. राजेश भूषण यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे कार्यवाही चालू असूनही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट होत नाही. त्यामुळे शासनाने अधिक कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक आणि प्रभावी रणनीती आखायला हवी.