१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करा !  

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मागणी

नवी देहली – सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍यांना कोरोनाची लस दिली जात आहे; मात्र ज्या वेगाने संसर्ग होत आहे ते पहाता आम्ही तुम्हाला विनंती करतो की, लसीकरणाची गती वाढवली पाहिजे. देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने अनुमती देण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहून केली आहे. या पत्रामध्ये असोसिएशनने ६ महत्त्वाची सूत्रे मांडली असून त्यांची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने पत्रात मांडलेली काही सूत्रे

१. सध्या कोरोना नियम न पाळणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करून देणे, आरोग्य कर्मचार्‍यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवण्यासह नियमानुसार संपूर्ण उपचार करून घेणे या गोष्टींवर सध्याच्या काळात भर देणे आवश्यक आहे.

२. सर्व नागरिकांना घरापासूनच चालत जाता येईल अशा अंतरावर कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच लसीकरणासाठी खासगी चिकित्सालय आणि रुग्णालय यांचेही साहाय्य घेतले पाहिजे. प्रत्येक डॉक्टरकडे लसीकरणाची सोय असेल, तर त्याचा सकारात्मक परिणाम लसीकरणावर दिसून येईल

३. जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरण टास्क फोर्स टीम सिद्ध करून त्यामध्ये सरकारी तसेच खासगी व्यक्तींचे साहाय्य घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यंत लसीकरण पोचवण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सभासद काम करण्यासाठी सिद्ध आहेत.

४. सार्वजनिक ठिकाणी फिरतांना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले पाहिजे. तसेच हे प्रमाणपत्र असेल, तरच शिधा आणि इतर सार्वजनिक सुविधा देण्याचा नियम केला पाहिजेे.

५. सध्या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेत न येणार्‍या म्हणजेच चित्रपट, संस्कृतिक आणि धार्मिक, तसेच क्रीडा या क्षेत्रांतील कार्यक्रमांवर तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात यावी.