गोव्यात १६ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा लागू होणार

पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – राज्यशासनाने ५ एप्रिल या दिवशी नवीन मोटर वाहन कायदा अधिसूचित केला असून, त्याची कार्यवाही १६ एप्रिल २०२१ पासून केली जाणार आहे. केंद्राच्या या नवीन मोटर वाहन कायद्याची कार्यवाही प्रारंभी कोरोना महामारी आणि नंतर राज्यातील रस्त्यांची खालावलेली स्थिती यांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. अखेर राज्यशासनाने हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मोटर वाहन कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

१. दुचाकी किंवा तीन चाकी चालवतांना भ्रमणभाषवर बोलतांना आढळणे – पहिल्या वेळी गुन्हा झाल्यास १ सहस्र ५०० रुपये दंड आणि दुसर्‍या वेळी किंवा त्याहून अधिक वेळा गुन्हा झाल्यास प्रत्येक वेळी १० सहस्र रुपये दंड

२. इतर ‘लाईट मोटर व्हेइकल’ चालवतांना भ्रमणभाषवर बोलतांना आढळणे – पहिल्या वेळी गुन्हा झाल्यास ३ सहस्र रुपये दंड आणि दुसर्‍या वेळी किंवा त्याहून अधिक वेळा गुन्हा झाल्यास प्रत्येक वेळी १० सहस्र रुपये दंड

३. सेफ्टी बेल्ट न घालता गाडी चालवणे – १ सहस्र रुपये दंड

४. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचा पाण्याचा बंब आदी आपत्कालीन सेवेला वाट मोकळी करून न देणे – १० सहस्र रुपये दंड

५. विनाकारण आणि सातत्याने ‘हॉर्न’ वाजवणे – १ सहस्र रुपये

६. सार्वजनिक ठिकाणी वाहनांची शर्यत लावणे – ५ सहस्र रुपये

७. सर्वाधिक गतीपेक्षा अधिक गतीने वाहन चालवणे – १ सहस्र ५०० रुपये