|
सातारा, ३१ मार्च (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील भारती विद्यापिठाच्या ‘गॉड्स व्हॅली’ या निवासी शाळेत इयत्ता १० वीमध्ये शिकणारा रोहन घारे या विद्यार्थ्याला शाळेतील वसतीगृह व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिक्षक प्रमोद हवालदार, कुमार शिंदे, मामा बनसोडे, प्राध्यापक रहिमान यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रोहनला शिक्षक प्रमोद हवालदार यांनी काठीने अमानुष मारहाण केली. त्यामुळे रोहनच्या पाठीवर काठीचे वळ उमटले असून तो गंभीर घायाळ झाला आहे. शिक्षकांनी त्याला वर्गातच कोंडून ठेवले. याविषयी रोहनच्या मित्राने त्याच्या बहिणीला भ्रमणभाष करून माहिती दिली. रोहनचे कुटुंबीय मुंबईहून पाचगणी येथे आल्यावर त्यांनी रोहनला उपचारासाठी रुग्णालयात नेले.
विद्यार्थ्याचा ‘गॉड्स व्हॅली’ शाळेविरुद्धचा आरोप खोटा आणि निराधार ! – शाळा व्यवस्थापन
या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देतांना म्हटले की, संबंधित विद्यार्थ्याने संरक्षक भिंतीवरून उडी मारून मुलींच्या वसतीगृहामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले; पण कोणतीही मारहाण केलेली नाही. विद्यार्थ्याने स्वत:च जखमा करून घेतल्या आहेत. याविषयी पालकांना शाळा व्यवस्थापनाने कळवले होते; मात्र ते ३ दिवसांनी आले. या विद्यार्थ्याने अनेकवेळा शाळा आणि वसतीगृह यांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याविषयी पालकांनाही वेळोवेळी कळवण्यात आले; मात्र विद्यार्थ्याचे भविष्य आणि पालकांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शाळेने कठोर निर्णय घेतले नाहीत. शाळा आणि कर्मचारी यांची मानहानी करण्याच्या हेतूने संबंधित विद्यार्थी अन् पालक यांनी आरोप केले आहेत. हे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत.
एका आठवड्यात कारवाई न झाल्यास पतित पावन संघटनेची आंदोलनाची चेतावणी !
पुणे – या प्रकरणाच्या अनुषंगाने ३० मार्च या दिवशी पतित पावन संघटनेच्या वतीने दोषींवर निलंबनाची कारवाई करा, या मागणीसाठी भारती विद्यापिठाचे मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे संचालकांना, तसेच वसतीगृहात होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरसोयीविषयी पुणे शहराच्या पदाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
त्या वेळी पुणे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष धनंजय क्षीरसागर, संतोष शेंडगे, पुणे शहराचे संपर्कप्रमुख गुरु भाऊ कोळी, स्वप्नील नाईक आणि विजय गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
एका आठवड्यात कारवाई न केल्यास पतित पावन संघटेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि योग्य त्या सरकारी प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे अथवा न्यायालयात संस्थेविरुद्ध तक्रार प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणी पतित पावन संघटनेने दिली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.