कणकवली – जागतिक स्तरावर संकरित वाणाच्या गायींच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांमुळे भारतीय वंशाच्या गोधनाला प्रचंड मागणी येऊ लागली आहे. देशी गायीच्या शेणापासून रंग सिद्ध करण्यास प्रारंभ झाला आहे. भाईंदर येथील एका संस्थेने शेणापासून लाकडाची निर्मिती केली आहे. आगामी काळात शेतकर्यांना अधिकचे उत्पन्न देणारे साधन म्हणून ‘शेण’ महत्त्वाचे ठरणार आहे, अशी माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
या पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे की,
१. अलीकडे केंद्र आणि राज्य शासनांच्या पशूधन विभागाच्या वतीने प्रत्येक ५ वर्षांनी करण्यात येणार्या पशूधन गणनेमध्ये कोकणातील पशूधनात कमालीची घट झाल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. विशेषतः ही घट देशी गायींच्या वाणामध्ये मोठ्या संख्येने आहे.
२. शेतीमध्ये यांत्रिकीकरण झाल्याने शेतामध्ये शेणखताचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय खताअभावी गांडुळाच्या आणि सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शेती उत्पादनांच्या दर्जामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झाली आहे. ती मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक परिणाम करणारी आहे.
३. या पार्श्वभूमीवर आता शेतकर्यांनी शेतीसाठी पूर्वीप्रमाणे देशी गाय-बैल यांचे मोठ्या प्रमाणात पालन करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
४. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच ‘गायीच्या शेणापासून सर्व प्रकारच्या रंगांची निर्मिती चालू झाली असून शेण प्रतिकिलो ५ रुपये दराने खरेदी केले जात आहे’, अशी माहिती दिली आहे.
५. मीरा-भाईंदर नजीकच्या उत्तन गावातील गोशाळेमध्ये असलेल्या २५० गायींच्या ३ टन शेणापासून डॉ. सुशील अग्रवाल यांनी २ फूट उंचीची लाकडे बनवण्यास प्रारंभ केला आहे.
६. ही लाकडे आठ-दहा दिवस उन्हात वाळवली जातात. या लाकडाचे वजन एक किलो असून ती प्रतिकिलो दहा रुपये प्रमाणे विकली जात आहेत.
७. ही लाकडे पर्यावरणपूरक असल्याने होळीमध्ये जाळण्यासाठी मोठी मागणी आहे. वैकुंठभूमीत (स्मशानभूमीत) या लाकडांना मागणी येऊ लागली आहे.
८. कोकणातील शेतकरी पूर्वीपासूनच आपल्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात प्रेमाने गोधन पाळत होता; पण तरुणवर्ग नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरांकडे वळल्याने हे गोधन हळूहळू लोप पावत गेले; मात्र गेल्या वर्षभरातील कोरोना महामारीमुळे जगरहाटीतील अनेक पालटांमुळे तरुण पुन्हा गावाकडे वळू लागला आहे.
९. आता दूधदुभत्या व्यतिरिक्त शेणापासूनच उत्तम दर्जाच्या शेती उत्पादनांसह शेण विकून भरघोस उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाल्याने आता कोकणामध्ये पुन्हा गोकुळ अवतरण्यास वेळ लागणार नाही.