होळी (हुताशनी पौर्णिमा)

‘फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ (होळी) या नावाने यज्ञ होऊ लागले.

पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी भगवान श्रीविष्णु प्रकट होताच त्यांच्यावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होणे

या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील महायज्ञाच्या वेळी भगवान श्रीविष्णु यांना यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ‘यर्व्य’ ऋषींनी प्रार्थना केली. भगवान श्रीविष्णु यांनी धरतीवर पाय ठेवताच स्वर्गातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. आजही उत्तर भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर आेंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात.

ओडिशातील विष्णु प्रकटोत्सव

ओडिशामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात आणि ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्यांच्याभोवती टिपर्‍या खेळतात.’

(संदर्भ : मासिक ‘विठाई’, मार्च २०१३)

होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥
– स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.

होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र

वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च । अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥
– ‘स्मृतिकौस्तुभ’

अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हेही वंदन करतात. त्यामुळे तू आमचे रक्षण कर. आम्हाला वैभव देणारी हो.


होळीच्या वेळी वापरावयाचे नैसर्गिक रंग आणि ते सिद्ध करण्याची पद्धत

‘होळीचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातो, जो मूळत: मोठा आरोग्य-हितकारी आहे; परंतु दुर्दैवाने हा रासायनिक रंगांनी साजरा केला जाऊ लागला आणि याला आणखी विकृत केले गेले. आज रासायनिक रंगांमुळे होणार्‍या हानी स्पष्ट आहेत. याव्यतिरिक्त स्वभावात शुष्कता आणि उग्रता येणे यांसारख्या कित्येक हानी होतात.

१. रंग, त्यात घातलेले रसायन आणि त्याचा होणारा दुष्परिणाम

२. नैसर्गिक रंग कसे सिद्ध करावेत ?

२ अ. केशरी रंग ः पळसाची फुले रात्री पाण्यात भिजत टाकावीत. सकाळी ती उकळून किंवा पाण्याला येणार्‍या रंगाचा आनंद लुटा. हा रंग कफ, पित्त, कुष्ठरोग, जळजळ, मूत्रकृच्छ (अडखळत लघवी होणे), वायू आणि रक्तदोष यांचा नाश करतो. रक्ताभिसरण सुरळीत होणे आणि मांसपेशी निरोगी ठेवणे यांसमवेत मानसिक शक्ती अन् इच्छाशक्तीचाही विकास करतो.

२ आ. हिरवा रंग

१. कोरडा रंग : केवळ मेंदी पावडर किंवा त्यात पीठ मिसळून सिद्ध केलेले मिश्रण वापरावे.
२. केवळ २ चमचे मेंदी पावडर १ लिटर पाण्यात चांगली मिसळल्याने रंग सिद्ध होतो.

२ इ. पिवळा रंग

१. कोरडा रंग : ४ चमचे बेसनमध्ये (हरभरा डाळीच्या पिठात) २ चमचे हळद मिसळावी.
२. केवळ २ चमचे हळदीत २ लिटर पाणी मिसळून चांगले उकळावे.

२ ई. जांभळा रंग : बीट पाण्यात उकडून वाटून घ्यावे.

२ उ. काळा रंग : आवळा चूर्ण लोखंडी भांड्यात रात्रभर भिजत ठेवावे.’

(संदर्भ : मासिक ‘लोक कल्याण सेतू’, जानेवारी २०१२)


होळी पारंपरिक धार्मिक प्रथेनुसारच साजरी करा !

सध्या काही धर्मविरोधी संघटना आणि निधर्मी राजकारणी वृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कचर्‍याची होळी करा’, असा चुकीचा संदेश समाजाला देतात. होळीला अर्पण केल्या जाणार्‍या पोळ्या गरिबांना वाटण्याचे आवाहन करतांना दिसतात. या दोन्ही गोष्टी शास्त्रविसंगत असून यातून कोणताही लाभ न होता उलट हानीच होते. हिंदूंना सणांचा आध्यात्मिक लाभ होऊ नये, यासाठी धर्मविरोधकांनी केलेली ही योजना आहे, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

१. होळी व्यतिरिक्त अन्य वेळी केली जाणारी वृक्षतोड न दिसणार्‍या आणि कचरा जाळण्याची बुद्धी न होणार्‍या धर्मविरोधी संघटनांचे सर्वच सामाजिक (?) उपक्रम हिंदु सणांच्या भोवती का अडखळत असतात ? या संघटनांनी वर्षभर होणारी अनाठायी वृक्षतोड किती वेळा रोखली ? वर्षभरात किती नवीन रोपटी लावली ?

२. ‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाच्या लाखो प्रतींसाठी आसाममधील तिन्सुकिया येथील एक महत्त्वाचे रान नष्ट केले गेले. या विषयावर कृती सोडाच, साधे भाष्यही न करणार्‍या संघटनांना होळीनिमित्त होणार्‍या वृक्षतोडीविषयी बोलण्याचा काय अधिकार ?

३. वर्षातून एक दिवस कचरा जाळून (तोही हिंदूंच्या सणाला) असा कोणता पालट होणार आहे ? किती धर्मविरोधी, हे आपला परिसर, गल्ली कचरामुक्त राखण्यासाठी वर्षभर धडपडतात ?

४. अग्नीला अर्पण करायची पोळी गरिबांना वाटायला सांगणार्‍या पुरोगाम्यांनो, गोरगरिबांना पोळ्या वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे का वाटत नाही ? हिंदूंच्या सणांच्या ‘आयत्या पिठा’वर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ माराव्याशा का वाटतात ?