शस्त्रक्रियांचे स्वयंघोषित ठेकेदार !

ही घटना आहे १ मार्च २०१६ या दिवशी उत्तरप्रदेशातील मेरठ येथील आनंद रुग्णालयात घडलेली. या दिवशी श्री. ओजस शर्मा या ८३ वर्षीय वृद्ध रुग्णावर प्रोस्ट्रेट शस्त्रक्रिया करण्यात आली. ४ घंट्यांच्या प्रदीर्घ शस्त्रक्रियेनंतर २४० ग्रॅमचा प्रोस्ट्रेट काढण्यात आला. या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर प्रतिजैविके (अ‍ॅन्टीबायोटिक्स) न देता ही शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रतिजैविके वापरणे हा शस्त्रक्रियेतील अविभाज्य भाग समजला जातो. या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला केवळ भूल देण्यात आली; मात्र शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर प्रतिजैविकांच्या ऐवजी आयुर्वेदीय औषधे देण्यात आली. शर्मा यांना अ‍ॅलोपॅथी औषधांची अ‍ॅलर्जी होती. ते केवळ आयुर्वेदीय औषधोपचारांना प्रतिसाद देत होते. त्यामुळे त्यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. या शस्त्रक्रियेनंतर शर्मा हे ठणठणीत बरे झाले. आधुनिक काळात प्रतिजैविकांचा वापर न करता शस्त्रक्रिया करण्याची ही जगातील पहिली घटना ! ‘पोटातून अमूक किलोचा ट्युमर काढला’, ‘मुलाने गिळलेले पेन, पेन्सिल काढून त्याचे प्राण वाचवले’, अशा तत्सम बातम्यांना आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते; मात्र ‘५ वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील एवढ्या मोठ्या घटनेला प्रसिद्धी का दिली गेली नाही ?’ याचा विचार होणे आवश्यक आहे. आनंद रुग्णालयातील या शस्त्रक्रियेच्या घटनेची उजळणी करण्याचे कारण म्हणजे आयुर्वेदाच्या पदव्युत्तर वैद्यांना शस्त्रकर्म करण्याची अनुमती देण्याविषयी उफाळून आलेला वाद होय. सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यांना ३९ सामान्य शस्त्रकर्म, तसेच डोळे, कान, नाक आणि गळा यांच्या संदर्भातील १९ शस्त्रकर्म करण्यास मान्यता दिली आहे. मागील वर्षी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या आधुनिक वैद्यांनी भारतात ठिकठिकाणी या निर्णयाच्या विरोधात आंदोलने केली. ही संघटना एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणात आता न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. ‘वैद्यकीय उपकरणांचे बारकावेही ठाऊक नसलेल्या आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची अनुमती कशी देता येईल ?’ असा प्रश्‍न आय.एम्.ए. संघटनेतील काही अतीशहाण्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. श्री. ओजस शर्मा यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया ही असे प्रश्‍न विचारणार्‍यांना चपराक आहे. या प्रकरणी न्यायालयात निकाल काय तो लागेलच; मात्र ‘शस्त्रक्रिया करण्याची ठेकेदारी केवळ आमच्याकडेच’ असा जो अहंगंड अ‍ॅलोपॅथीची पदवी घेणार्‍या बहुतांश डॉक्टरांमध्ये निर्माण झाला आहे, त्याचे उच्चाटन होणे आवश्यक आहे.

मक्तेदारी संपुष्टात येण्याची भीती !

‘पदवीधर आयुर्वेद वैद्यांना शस्त्रक्रिया करण्याची अनुमती दिली, तर ‘खिचडी वैद्यकीय प्रणाली’ निर्माण होऊ शकते. असे केल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्र भ्रष्ट होऊ शकते’, असे आय.एम्.ए. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांचे म्हणणे आहे. डॉ. शर्मा यांना ‘२०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले आधुनिक वैद्यकशास्त्र भ्रष्ट होईल’ याची चिंता सतावत आहे; मात्र ‘लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेला आयुर्वेद काळाच्या पडद्याआड जात आहे’, याची त्यांना चिंता नाही. डॉ. शर्मा यांच्या मते शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य प्राप्त होण्यासाठी वर्षानुवर्षे अथक प्रयत्न घ्यावे लागतात. हेही योग्यच; मात्र आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारेही ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी कष्ट घेतात, त्याचे काय ? एका सर्वेक्षणानुसार भारतातील पदव्युत्तर आयुर्वेद वैद्य हे वर्षाला १ सहस्राहून अधिक शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे आयुर्वेद वैद्यांना ‘अडाणी’ किंवा ‘ग्राम्य’ समजणे हास्यास्पद ठरेल. बरं, आयुर्वेद वैद्यांनी एका ८३ वर्षीय रुग्णावर आधुनिक वैद्यकशास्त्रात रूढ असलेल्या एका परंपरेला छेद देऊन यशस्वी शस्त्रक्रिया केली, त्याविषयी कुणीच का बोलत नाही ? ८३ व्या वर्षी एखादी शस्त्रक्रिया शरिराला झेपणे कठीण असते. या वयात बरेच आजार असतात. त्यामुळे वैद्य कुठलाच धोका पत्करायला सिद्ध नसतात; मात्र ही सर्व सूत्रे लक्षात घेऊन आनंद रुग्णालयातील आयुर्वेद वैद्यांनी हा धोका पत्करला आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. शर्मा यांच्यासारख्या आधुनिक वैद्यांना त्याचे कौतुक का वाटत नाही ? प्रयोगशीलता हा वैद्यकशास्त्राचा गुण आहे. श्री. ओजस शर्मा यांच्यावर केलेली शस्त्रक्रिया हाही असाच प्रयोग होता. आयुर्वेद वैद्यांकडून झालेला हा प्रयोग, तसेच असे अन्य प्रयोग अभ्यासण्याचा मोठेपणा डॉ. शर्मा यांच्यासारखे आधुनिक वैद्य का दाखवत नाहीत ?

या सर्व सूत्रांचा आढावा घेता आय.एम्.ए.कडून होणारा विरोध हा तथ्यहीन आहे, असे म्हणण्यास वाव आहे. ‘इथे कुठेतरी शस्त्रक्रिया करण्याची मक्तेदारी आपण हरवून बसवू कि काय ?’, अशी भीती या विरोधामागील प्रमुख कारण आहे.

 रुग्ण हा केंद्रबिंदू हवा !

‘उद्या एखाद्याला जीवघेणा अपघात झाल्यास तुम्ही त्याच्यावर आयुर्वेद औषधोपचार करणार कि त्याला ‘मल्टी स्पेशालिटी’ रुग्णालयात भरती करणार ?’, असाही प्रश्‍नही आयुर्वेदाचे समर्थन करणार्‍यांना विचारला जातो. मुळात येथे अ‍ॅलोपॅथी श्रेष्ठ कि आयुर्वेद हा प्रश्‍न नाही. वैद्य मग तो कुठल्याही ‘पॅथी’चा असो, रुग्णाला बरे करणे, हा त्याच्या उपचाराचा केंद्रबिंदू हवा. आय.एम्.ए.कडून जो काही लढा दिला जात आहे, तेथे रुग्णांच्या हिताविषयी म्हणावी तशी चर्चा झालेली नाही, असे चित्र आहे. आरोग्यसेवेत बर्‍याच वेळा उपलब्धता ही गुणवत्तेपेक्षा महत्त्वाची असते. आरोग्यक्षेत्राशी निगडित कुठल्याही वादाचा हा केंद्रबिंदू हवा. भारतात शहरी आणि त्याहून अधिक ग्रामीण क्षेत्रात आरोग्यसेवा अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, यासाठी सर्वच पॅथींच्या वैद्यांनी हातात हात घालून प्रयत्न करावेत. भारतात असे चित्र पहाता येईल का ?

आजही वैद्यांना देव मानणारा समाज भारतात आहे. त्याने आयुर्वेदाचे शिक्षण घेतले आहे कि अ‍ॅलोपॅथीचे हे पाहिले जात नाही. एखाद्या वैद्याचा हातगुण चांगला; म्हणून त्याच्याकडून उपचार करून घेण्यासाठी घंटोन्घंटे त्याची वाट पहाणारे रुग्ण आजही पहायला मिळतात. त्यांचे समाधान करण्याचे दायित्व या वैद्यांचे आहे. थोडक्यात ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !