मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ट्विटरवरून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड !

राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी !

मुंबई –देशातील सध्याची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. त्यांची स्थिती अत्यंत भयावह आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे. हिंदूंच्या धार्मिक परंपरा, कृती आणि व्यवस्था यांच्यामध्ये सरकारचा मनमानीपणाने हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे तेथील सात्त्विकता नष्ट होत आहे. याच्या विरोधात १४ मार्च या दिवशी सकाळी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. यावर ३ लाखांहून अधिक ट्वीट करण्यात आले आणि दुपारपर्यंत हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर पहिल्या क्रमांकावर होता. याद्वारे धर्मप्रेमींनी मंदिरांची दुःस्थिती पालटण्यासाठी मंदिरांचे नियंत्रण धर्मनिरपेक्ष सरकारांच्या कह्यातून भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी केली.

 काही धर्माभिमान्यांनी केलेले ट्वीट्स !

१. सरकार कधी कोणत्या मशिदीला किंवा चर्चला नियंत्रणात घेण्याचे धाडस का करत नाही ? केवळ हिंदूंच्या मंदिरांच्या वेळीच असे धाडस कसे दाखवले जाते ?

२. मंदिरामध्ये भक्त त्यांच्या श्रद्धेपोटी धन अर्पण करतात; मात्र सरकारीकरणामुळे या मंदिरांमधील या धनाचे पुढे काय होते, याची माहिती मिळत नाही. काही मंदिरांमध्ये  भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. जर मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या पैशांचा भ्रष्टाचार होत असेल आणि भ्रष्टाचार्‍यांच्या खिशात हा पैसा जात असेल, तर भक्तांनी मंदिरांना दान का करावे ?

३. मंदिरांमध्ये गोळा होणारा पैसा केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यासाठीच खर्च झाला पाहिजे. याचा उपयोग हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हिंदूंच्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, गुरुकुल निर्माण करणे आदींसाठी झाला पाहिजे.