हरिद्वार, ११ मार्च (वार्ता.) – येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रसंगी ‘हर की पौडी’ येथे विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्वर यांसह साधू-संत आणि लाखो भाविक यांनी गंगास्नान केले. ११ मार्चच्या मध्यरात्रीपासून सायंकाळपर्यंत २२ लाखांहून अधिक भाविकांनी गंगास्नाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती कुंभमेळ्यासाठी नियुक्त असलेले पोलीस महासंचालक संजय गुंज्याल यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हर की पौडी येथे येऊन गंगामातेचे दर्शन घेतले आणि ‘सर्व जनतेसाठी सुख-समृद्धी लाभावी’, अशी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे त्यांनी पवित्र स्नानासाठी आलेले साधूसंत आणि श्रद्धाळू यांचे स्वागत केले.
१. पवित्र स्नानासाठी ११ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून विविध साधूसंतांचे आखाडे हरि की पौडी घाटावर भव्य मिरवणुकीद्वारे आले. तत्पूर्वी सकाळी ७ पर्यंत हा घाट सर्वसामान्यांना स्नानासाठी चालू ठेवण्यात आला होता. त्यानंतर केवळ आखाड्यांच्या साधूसंतांना स्नानाला प्रवेश देण्यात आला.
२. विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्वर हे फुलांनी सजवलेल्या रथांमध्ये भव्य मिरवणुकीद्वारे टप्प्या-टप्प्याने घाटावर आलेे.
३. या वेळी शासनाच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच स्थानिक लोकांनीही या मिरवणुकांवर पुष्पवृष्टी करून संतांचे स्वागत केले.
४. पवित्र स्नानासाठी प्रथम श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे साधुसंत आले. या आखाड्याचे नेतृत्व आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांनी केले. त्यानंतर श्री शंभू पंच अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, किन्नर आखाडा यांसह अन्य आखाड्यांचे साधुसंत यांनी पवित्र स्नान केले.
क्षणचित्रे
१. ऋषिकुल गंगा घाट, कश्यप घाट, गोविंदपुरी, प्रेमनगर आश्रम घाट, अलकनंदा घाट, बिरला घाट या ठिकाणी भाविकांनी स्नान केले.
२. प्रशासनाच्या वतीने बॉम्बशोधक पथक, अर्ध सैनिक दल, सीमा सुरक्षा दल यांसह स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
३. कोरोना रॅपिड चाचणीद्वारे भाविकांच्या पडताळण्या केल्या जात होत्या.