कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सतर्क !
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘कोविड-१९’च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिल्या.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या अन्य सूचना
१. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर चालू करावे.
२. अधिकाधिक वेळ लसीकरण चालू राहील, या दृष्टीने नियोजन करावे. लोकांमधील लसीविषयीचे गैरसज दूर करून अधिकाधिक लोक लसीकरणासाठी येतील, यासाठी प्रयत्न करावेत.
३. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर घशातील स्रावाचे (स्वॅबचे) नमुने घेण्याचे नियोजन करावे.
४. गृह अलगीकरणात असतांना रुग्ण जर नियमांचे पालन करत नसेल, तर त्यास थेट संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. त्यासाठी शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढवावी.
५. अलगीकरणासाठी शासकीय संस्था अधिग्रहित कराव्यात. कोविड केअर सेंटरसाठीच्या जागा निश्चित करण्यात याव्यात.
६. चाचण्या करत असतांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्यांवर अधिक भर देण्यात यावा.
७. कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचे ‘ऑडिट’ करण्यात यावे.
सिंधुदुर्गात कोरोनामुळे एकाचा मृत्यू
१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १५
२. उपचार चालू असलेले रुग्ण १६६
३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र १८०
४. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १७६
५. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र ५२७
एप्रिल आणि मे या मासांत असलेल्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावाहून जिल्ह्यात येणार्या व्यक्ती, होळीचा सण आणि आंबा अन् काजू यांची जिल्ह्याबाहेर होणारी वाहतूक या पार्श्वभूमीवर सतर्क राहून त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या वेळी केली.