परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या अपार भावामुळे शारीरिक त्रासातही अखंड सेवारत असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !

माघ कृष्ण पक्ष नवमी (७.३.२०२१) या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई श्रीमती सुरेखा सरसर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. मनीषा पाठक

सौ. मनीषा महेश पाठक यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. लहान बहिणींना दायित्व घेऊन प्रेमाने सांभाळणे

‘मनीषा आमचे पहिले अपत्य. त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी होती. ती शांत आणि समजूतदार होती. तिला रडणे किंवा हट्ट करणे ठाऊकच नव्हते. तिच्या नंतर झालेल्या तिच्या दोन्ही बहिणींनाही तिने दायित्व घेऊन प्रेमाने सांभाळले. त्यामुळे त्यांना अजूनही तिचा आधार वाटतो.

श्रीमती सुरेखा सरसर

२. लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीची असणे

मनीषा लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीची आहे. शाळेत असतांना ‘गणपति मंदिरात जाणे, श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करणे, नामजप करणे’, हे ती करत असे.

३. सनातनशी संपर्क

आमच्या घरी नांदेडला सौ. विद्या जाखोटिया यांचा पहिला सत्संग झाला. तोपर्यंत ‘सनातन’ हे नावही आम्हाला ठाऊक नव्हते. त्यानंतर मनीषाची अध्यात्मातील गोडी वाढली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील तिची श्रद्धा दृढ झाली. या काळात घरात काही प्रसंग घडले की, त्याचा मला पुष्कळ मानसिक आणि शारीरिक त्रास झाला; परंतु लहान असूनही तिने मला आधार दिला.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अपघातांतून वाचल्याविषयी आलेल्या अनुभूती

४ अ. आगाशीतून खाली पडूनही किरकोळ मुका मार लागणे : मनीषा दहावीला असतांनाचा प्रसंग आठवला की, अक्षरशः अंगावर काटा येतो. वार्षिक परीक्षेच्या पहिल्या दिवशी पहाटे ४ वाजता ती आगाशीमध्ये उभी असतांना तिचा तोल जाऊन ती वरून खाली पडली. आम्ही सगळे घाबरलो होतो. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिल्यानंतर श्रीमन्नारायणाने झेलले, त्याचप्रमाणे परम पूज्य गुरुदेव, तुम्ही तिला हातावर झेलले. त्यामुळे तिला किरकोळ मुका मार लागला. आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटले की, एवढ्या उंचावरून पडल्यानंतरही तिला काहीही झाले नाही. परात्पर गुरु डॉक्टर, हे सर्व तुमच्यामुळे आणि तिच्या देवावर असलेल्या श्रद्धेमुळेच घडले.

४ आ. गाडीचा अपघात होऊन खाली पडणे आणि समोरून येणार्‍या ट्रकचालकाने ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळणे : मनीषा महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाला असतांना तिच्या गाडीचा अपघात होऊन ती खाली पडली. तेव्हा मार्गावरून एक अवजड ट्रक येत होता. त्या ट्रकचालकाने तिला पडलेले पाहून जोरात ‘ब्रेक’ दाबून ट्रक थांबवला. ‘ट्रक थांबला नसता, तर काय झाले असते ?’, याची कल्पनाही करवत नाही. परात्पर गुरु डॉक्टर, ‘तुम्हीच तिला या दोन्ही प्रसंगांतून वाचवले’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

५. विवाहानंतर सर्व दायित्व सांभाळून साधनेतही प्रगती करणे

मनीषाच्या लग्नानंतर तिची साधनेत प्रगती झाली. नोकरी आणि घर सांभाळून तिच्या सेवा अखंड चालू असत. तिचे यजमान श्री. महेश पाठक हेही साधक असल्याने त्यांचे तिला पूर्ण साहाय्य मिळते. श्री. महेश यांचा स्वभाव प्रेमळ, मनमिळाऊ आणि शांत आहे. मला मुलगा नसल्याची उणीव त्यांनी कधीच भासू दिली नाही. ते मनीषाची आणि कुटुंबातील सगळ्यांची पुष्कळ काळजी घेतात. परमेश्‍वरा, असा जावई दिल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझी नात कु. प्रार्थना हिच्या जन्मानंतरही ती ४ मासांची असल्यापासूनच मनीषाची साधना आणि सेवा चालूच होती. कु. प्रार्थना शांत असल्यामुळे ती दिवसभर पाळणाघरात आणि इतर साधकांकडे रहात असे.

६. रुग्णाईत वडिलांची सेवा करणे आणि त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांना आधार देणे

मनीषा अमेरिकेत असतांना तिचे वडील कर्करोगाने रुग्णाईत झाले. तेव्हा ती अमेरिकेहून परत आली. तिने वडिलांची पुष्कळ सेवा केली. ‘प्रतिदिन आध्यात्मिक उपाय करणे, प्रार्थना करणे’, यांमुळे घरातील वातावरण संपूर्णपणे पालटले. तिचे वडील गेल्यानंतरही नांदेड येथे दोन मास राहून तिने आम्हाला मानसिक आधार दिला. ‘परात्पर गुरु डॉक्टरच मला हे सगळे करण्याची शक्ती देतात’, असे ती म्हणायची.

७. पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही शांतपणे रात्रंदिवस सेवा करणे

मागील ३ वर्षांपासून ती हाडाच्या आजारामुळे सतत अंथरुणावर झोपूनच असते. तिला पाठ, गुडघे आणि मानेचा मणका यांचा त्रास कधी कधी अतिशय असह्य होतो, तरीही ती चिडचिड न करता शांतपणे सगळे सहन करते. तिला चालतांना त्रास होतो; परंतु तिची सेवा झोपलेल्या अवस्थेतही रात्रंदिवस चालू असते.

८. उपचारांसाठी रामनाथी आश्रमात येणे

८ अ. रामनाथीला येतांना तोंडवळ्यावर गुरुभेटीची तीव्र तळमळ दिसणे : मार्च २०२० मध्ये तिच्या उपचारांसाठी आम्ही रामनाथी आश्रमात आलो. येतांना प्रवासात ‘प.पू. भक्तराज महाराज गुरूंच्या भेटीसाठी तळमळत होते’, याची आठवण झाली आणि त्यांच्या नाटकातील ‘निघाला दिनकर रेवा तिरी’ ही ओळ आठवली. ‘मनीषासुद्धा गुरूंच्या भेटीच्या ओढीने आश्रमात निघाली आहे’, असेच तिच्या आनंदी तोंडवळ्याकडे पाहून वाटत होते.

८ आ. मनीषाला गुरुकार्याची तीव्र तळमळ आणि ‘सर्व साधकांना साधनेत पुढे घेऊन जाण्याचा ध्यास रात्रंदिवस लागलेला असतो.

८ इ. भाव : ती म्हणते, ‘‘मी साधनेत आले नसते, तर माझे काय झाले असते ?’, हे मला ठाऊक नाही.’’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती तिच्या असलेल्या अपार भावामुळेच ती आध्यात्मिक, तसेच शारीरिक त्रास सहन करू शकते’, असे मला वाटते.

८ ई. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

८ ई १. प्रकृती सुधारणे : या काळात देवाच्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने तिला रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली. आश्रमातील चैतन्यामुळे, योग्य उपचारांमुळे आणि साधक करत असलेल्या सेवेमुळे तिच्या प्रकृतीत पुष्कळ पालट झाला.

८ ई २. रहात असलेल्या खोलीचा आकार मोठा झाल्यासारखा जाणवणे : आश्रमात आणि आश्रमातील खोलीतही तिचे सातत्याने भ्रमणभाषवरून सत्संग अन् सेवा चालू असतात. कधी कधी मला वाटायचे, ‘पूर्ण पुणे जिल्हा त्या खोलीमध्ये सामावलेला आहे.’ त्या वेळी खोलीचा आकारही मोठा झाल्यासारखे जाणवायचे.

‘हे परमेश्‍वरा, परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या कृपेमुळेच मला मनीषासारखी मुलगी देवाने दिली. तिची साधनेत प्रगती होऊन ती लवकरच संतपदाला पोचू देत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे. ‘प.पू. गुरुदेव, ‘तुम्हीच माझ्याकडून हे लिखाण करवून घेतले’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती सुरेखा सरसर (सौ. मनीषा पाठक यांच्या आई), नांदेड (फेब्रुवारी २०२१)


६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांच्याशी सूक्ष्मातून संवाद चालू असल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

१. सत्संग संपला, तरीही सौ. मनीषाताईंचा आवाज दिवसभर कानात घुमत रहाणे

‘सौ. मनीषा पाठक सध्या रामनाथीला आहेत; पण मला मात्र ताई माझ्याजवळच असल्याचे सतत जाणवत असते. त्या पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी ‘गुरुलीला’ सत्संग घेतात. त्या प्रतिदिन गुरुचरणांवरील फूल होऊन आम्हा सर्व साधकांना समर्पित करतात. सत्संग संपला, तरीही ताईचा आवाज दिवसभर कानात घुमत असतो. ‘ताई आणि माझ्यातील अंतर संपले आहे’, असे मला जाणवते.

२. चुका होत असतांना सूक्ष्मातून शरणागतीसाठी प्रयत्न करण्याची आठवण करून देणे

माझ्याकडून काही चुका होऊ लागल्या किंवा मी प्रयत्नांमध्ये कुठे न्यून पडू लागले की, मला ताईंचा आवाज ऐकू येतो, ‘अगं प्रार्थना, आपण देवाच्या चरणी शरण जाऊया, बघ देव तुझ्याकडून करवून घेईलच !’

३. भावप्रयोग करत असतांना सूक्ष्मातून ताईंचा आवाज ऐकू येणे

४.२.२०२१ या दिवशी दुपारी पोळ्या करतांना मी मनातून भावप्रयोग करत होते. तेव्हा मला ताईंचा आवाज ऐकू आला आणि मी म्हणाले, ‘हो मनिषाताई.’ थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, ‘ताईंशी चालू असणारा संवाद म्हणजेे गुरुसंकीर्तन असून हा एक प्रकारे गुरुमहिमाच आहे.’

४. दोघींमध्ये ‘गुरुभक्तीची ओढ निर्माण करणारा एक बंधच निर्माण झाला आहे’, असे वाटणे

आता वाटते, ‘आमच्यामध्ये स्थुलातून अंतर असले, तरी देवाने आमच्या आत्म्यातील अंतर संपवून टाकले आहे. आता आमच्यात गुरुभक्तीची ओढ निर्माण करणारा एक बंधच निर्माण झाला आहे.’

५. ‘ताईंच्या मायेची आणि त्यांच्या प्रेमळ शब्दांची अंतःकरणाला सवय झाली आहे’, असे वाटणे

१५.२.२०२१ या दिवशी मनीषाताईचा भ्रमणभाष आला. तेव्हा मला ताईशी बोलतांना निराळे वाटलेच नाही; कारण आम्ही सूक्ष्मातून नेहमीच बोलत असतो. ‘ताईच्या मायेची आणि तिच्या प्रेमळ शब्दांची माझ्या अंतःकरणाला सवयच झाली आहे’, असे वाटले.

‘गुरुमाऊली, तुम्ही आम्हा साधकांना किती प्रेमाने आणि आनंदाने बांधून ठेवले आहे ! यामध्ये ना कसली अपेक्षा, ना स्वार्थ, ना कसला हव्यास ! आहे ती केवळ एकमेकांना आनंदाची देवाण-घेवाण करणारी भगवत्प्रेमाची उधळण ! गुरुमाऊली, तुमची लीलाच अगाध आहे. ‘आम्हा लेकरांना असेच तुमच्या संकीर्तनात मग्न ठेवा’, हीच आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. प्रार्थना बुवा, सिंहगड रस्ता, पुणे. (१७.२.२०२१)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक