दुर्ग, छत्तीसगड (मध्यप्रदेश) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १४ वर्षे) हिची तिच्या वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. लहानपणापासून सेवेची आवड असणे
‘कु. शर्वरीला लहानपणापासून सेवेची पुष्कळ आवड आहे. ती कोणतीही सेवा करायला सिद्ध असते. सेवा करायची म्हटली की, तिला पुष्कळ उत्साह वाटतो. ती सनातनच्या वितरण कक्षावरील ग्रंथ, नामपट्ट्या, देवतांची चित्रे आणि सनातनची सात्त्विक उत्पादने मोजणे अन् त्यांची बांधणी करणे, अशा सेवा करते.
२. बिनचूक सेवा करणे
ती वयाने लहान असूनसुद्धा सर्व साहित्य तसेच सुटे पैसे अचूक मोजते. त्यामुळे साधक उपलब्ध नसल्यास या सेवा करण्यासाठी मला तिचा मोठा आधार वाटतो.
३. बोलण्यामुळे लोक प्रभावित होणे
३ अ. श्रीराम आणि हनुमान यांचा जयघोष केल्यावर भाविकही तिच्यासह घोषणा देऊ लागणे : हनुमान जयंतीला भिलाई (दुर्ग, छत्तीसगढ) येथे पुष्कळ मोठा भंडारा असल्याने लोकांची भरपूर गर्दी असते. वर्ष २०१८ मध्येे आम्ही तेथे सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावले होते. तेव्हा शर्वरी सायंकाळी ध्वनीक्षेपक (माईक) हातात घेऊन अकस्मातपणे ‘जय श्रीराम’ ‘जय जय श्रीराम’ ‘बजरंग बली हनुमान की जय ।’ ‘पवनसुत हनुमान की जय’, अशा घोषणा देऊ लागली. तिच्या या घोषणा ऐकून दर्शनासाठी रांगेत उभे असणारे सर्व भाविकही तिच्यासह घोषणा देऊ लागले.
३ आ. शर्वरीने लोकांना सनातनच्या उदबत्तीची माहिती सांगितल्यावर ‘तू छान माहिती सांगितलीस’, असे म्हणून लोकांनी उदबत्ती घेणे : आम्ही सनातनचे पंचांग वितरण करतांना पंचांगाच्या समवेत सनातनच्या लहान आकारातील ५ उदबत्ती पाकिटांचा एक संच करून त्याचेही वितरण करतो. तेव्हा ती आमच्या समवेत प्रत्येक दुकानात येऊन उदबत्तीची माहिती सांगते. कुणाला उदबत्ती नको असेल, तरी तिचे बोलणे ऐकून लोक म्हणतात, ‘‘तू उदबत्तीची किती छान माहिती सांगितलीस !’’ आणि ते उदबत्ती घेतात.
४. राजिम (छत्तीसगड) येथील कुंभमेळ्यात शर्वरीने केलेल्या सेवा
राजिम येथे त्रिवेणी संगमावर माघ पौर्णिमा ते महाशिवरात्री या कालावधीत १५ दिवसांचा राजिम कुंभमेळा भरतो. वर्ष २०१३ पासून तेथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात येते. कुलेश्वर महादेव मंदिरात येणार्या भाविकांची गर्दी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या समोरून जाते; पण त्यातील अनेक लोक प्रदर्शनाच्या समोरून निघून जातात. एक किंवा दोन साधक भाविकांची गर्दी आणि परिस्थिती यांनुसार लोकांना प्रदर्शन पहाण्यासाठी बोलावण्याची सेवा करतात. अनेक जण प्रदर्शन बघायला आतमध्ये आल्यावर प्रदर्शनाची भव्यता आणि चैतन्याने प्रभावित होतात. तेथील फ्लेक्स प्रदर्शनाचा लाभ घेतात आणि सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने घेऊनच जातात.
४ अ. वयाने लहान असूनही शर्वरीने सर्व सेवा उत्साहाने करणे आणि सर्वांना ती हवीहवीशी वाटणे : राजिम हे ठिकाण दुर्गपासून ७५ कि.मी. अंतरावर आहे. शर्वरी ५ वर्षांची असल्यापासून प्रतिवर्षी राजिम कुंभमेळ्यात उत्साहाने सेवेला येते. तिच्यापेक्षा वयाने मोठे असणार्या साधकांसह ती सर्व प्रकारच्या सेवा करण्याचा प्रयत्न करते. कुंभमेळ्यासाठी येणार्या सर्व साधकांना ती हवीहवीशी वाटते.
४ आ. शर्वरीचे उत्साहपूर्वक आणि प्रभावी बोलणे, आत्मविश्वास, आवाजातील गोडवा अन् भाव यांमुळे तिचे बोलणे ऐकून लोक आकर्षित होणे आणि त्यामुळे ग्रंथ प्रदर्शन पहायला येणार्यांची संख्या वाढणे : वर्ष २०१६ मध्ये सनातनचे हितचिंतक आणि गायत्री परिवाराचे श्री. आनंद श्रीवास्तव यांनी त्यांच्याकडे असलेली एक ‘साऊंड सिस्टीम’ (ध्वनीप्रणाली) महाशिवरात्रीच्या दिवशी साधकांना वापरण्यासाठी दिली. त्या दिवशी महाशिवरात्र असल्याने लोकांची सर्वाधिक गर्दी होती. ध्वनीप्रणालीचा वापर करून साधक उद्घोषणा करून लोकांना ग्रंथ प्रदर्शन पहाण्यासाठी बोलावू लागले. शर्वरीलाही कागदावर काही वाक्ये लिहून दिल्यावर ती उद्घोषणा करू लागली. शर्वरी उद्घोषणा करू लागल्यावर अकस्मातपणे प्रदर्शन पहायला येणार्या लोकांची संख्या पुष्कळ वाढली.
काही लोक प्रदर्शनाच्या आत जाण्याऐवजी शर्वरीच्या भोवती ती सांगत असलेल्या गोष्टी लक्ष देऊन ऐकत होते. त्या गर्दीला बघून बाजूला जाणारे लोकही घोळका करून तिच्याभोवती उभे राहून तिचे बोलणे ऐकत होते. तिचे उत्साहपूर्वक आणि प्रभावी बोलणे, आत्मविश्वास, आवाजातील गोडवा अन् भाव यांमुळे तिचे बोलणे लोकांना आकर्षित करत असे. त्या वेळी लोक सहजपणे प्रदर्शन पहाण्यासाठी आत येत होते. लोकांना बोलावण्यासाठी तेवढे प्रयत्न करावे लागले नाहीत. काही लोकांनी शर्वरीचे बोलणे ऐकून तिचे छायाचित्र काढले, तर काहींनी ध्वनीचित्रीकरण केले. त्या वेळी शर्वरीचे वय ९ वर्षे होते.
४ इ. फ्लेक्सवरील माहिती सांगत असतांना एका युवकाने खोडसाळपणे प्रश्न विचारणे आणि शर्वरीने संयमाने अन् ठामपणे उत्तर दिल्यावर त्याने छान उत्तर दिल्याविषयी शर्वरीचे कौतुक करणे आणि तिला बक्षीस म्हणून १०० रुपये देणे, तेव्हा शर्वरीने ‘आम्ही हे सर्व गुरुसेवा म्हणून करत असून तुम्हाला पैसे द्यायचे असतील, तर अर्पणपेटीत टाका’, असे सांगणे : युवकांचा एक गट फ्लेक्स प्रदर्शन बघत होता. ते ‘वाढदिवस कसा साजरा करावा ?’ या फ्लेक्समधील ‘केक कापून आणि मेणबत्ती विझवून’ या लिखाणाविषयी आपापसांत बोलत होते. तेव्हा शर्वरी अकस्मात्पणे तेथे जाऊन त्यांना फ्लेक्सविषयी माहिती सांगू लागली. तेव्हा ते युवक आश्चर्याने तिचे बोलणे ऐकू लागले. त्यातील एक युवक मुद्दाम तिला खोडसाळ प्रश्न विचारू लागला. तिने उत्तर दिल्यावर पुन्हा प्रतिप्रश्न करत होता. तेव्हा तिने संयमाने त्या युवकाला शास्त्र समजावून सांगितले, तरीही त्या युवकाने पुन्हा खोडसाळ प्रश्न विचारला. तेव्हा शर्वरीने वीरवृत्तीने सांगितले, ‘‘वाढदिवस साजरा करण्याचे खरे शास्त्र हेच आहे.’’ त्या वेळी तो युवक निरुत्तर झाला. शर्वरीच्या बोलण्याने प्रभावित होऊन त्याने म्हटले, ‘‘मी तुला मुद्दाम असे प्रश्न विचारत होतो. तू छान उत्तरे दिलीस.’’ त्याने तिला बक्षीस म्हणून १०० रुपये दिले. तेव्हा शर्वरी म्हणाली, ‘‘आम्ही हे सर्व गुरुसेवा म्हणून करतो. तुम्हाला १०० रुपये द्यायचे असतील, तर ते अर्पणपेटीत टाका.’’
४ ई. कबीर संप्रदायाच्या एका संतांनी शर्वरीच्या उद्घोषणा ऐकून तिचे कौतुक करून आशीर्वाद देणे आणि तिला हार घालणे : सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाच्या बाजूला कबीर संप्रदायाचा तंबू होता. तेथील एक संत प्रतिदिन आपल्या प्रदर्शनावर यायचे आणि शर्वरीच्या उद्घोषणांनी प्रभावित होऊन तिचे कौतुक करून तिला आशीर्वाद द्यायचे. एक दिवस शर्वरीच्या उद्घोषणा ऐकल्यावर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी शर्वरीला हार घातला.
४ उ. तंबाखू खाणार्या एका युवकाचे शर्वरीने प्रबोधन करणे आणि त्याने स्वतःची चूक मान्य करून शर्वरीला नमस्कार करणे : एके दिवशी नेहमीप्रमाणे शर्वरी उद्घोषणा करत असतांना तिच्याभोवती अनेक लोक आणि युवक जमा झाले. ‘एवढी लहान मुलगी एवढे कसे काय बोलू शकते ?’, याचे त्यांना पुष्कळ कौतुक वाटत होते. ते तिच्याशी बोलू लागले. तेव्हा त्यांपैकी एक युवक तंबाखू खात होता. शर्वरीने त्याला तंबाखू न खाण्याविषयी सांगून त्याचे प्रबोधन केले. तेव्हा त्याने स्वतःची चूक स्वीकारली आणि शर्वरीला नमस्कार केला. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्व युवकांनी ‘भारत माता की जय’, अशी घोषणा दिली.
४ ऊ. शर्वरी परीक्षेसाठी घरी जाणार असल्याने तिचे ध्वनीचित्रीकरण करून ते प्रोजेक्टवर लावणे आणि त्या वेळीही तिचा आवाज ऐकून लांबूनही लोक प्रदर्शन पहाण्यासाठी येणे : राजिम कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी तिची परीक्षा असल्याने ती घरी गेली. तेव्हा ती उद्घोषणा करत असल्याचे ध्वनीचित्रीकरण ‘प्रोजेक्टर’वर लावले. त्या वेळीही तिचा आवाज ऐकून लोक दुरूनही प्रदर्शनाकडे यायचे. तेव्हा लक्षात आले की, तिचे तळमळीने आणि भावपूर्ण बोलावणे अन् वाणीतील चैतन्य यांमुळे प्रभावित होऊन लोक सहज प्रदर्शनाकडे आकर्षित व्हायचे.
‘परात्पर गुरुदेव, तुम्ही शर्वरीत हे गुण आणि भाव निर्माण केला आहे. तुम्हीच माझ्याकडून ही सर्व सूत्रे लिहून घेतलीत. यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. हेमंत कानस्कर (वडील), दुर्ग, छत्तीसगढ. (१२.६.२०१९)