आळेफाटा (पुणे) येथे वर कोबीची पोती लावून गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

पुणे – आळेफाटा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांच्या विश्‍वासू सहकार्‍यांनी आळेफाटा पोलिसांच्या साहाय्याने २ टन गोमांसाने भरलेला टेम्पो कह्यात घेतला. आळेफाटा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून सर्व गोमांस टाकून देण्यात आले आहे. या कारवाईमध्ये अभिजित चव्हाण, शरद कोतकर, कृष्णा माने, गणेश थोरात, ऋषिकेश जंगम आदी गोरक्षकांनी सहभाग घेतला.

पोलिसांच्या साहाय्याने या टेम्पोची पहाणी केली असता मागील बाजूस कोबीची पोती आणि कोबी ठेवलेले होते अन् आतील बाजूस काळ्या रंगाच्या ताडपत्रीमध्ये गाय आणि बैल यांची मुंडकी, कातडी काढलेल्या अवस्थेत धड आणि पाय आढळून आले. पोलिसांनी गाडीचालकाकडे चौकशी केली असता चालकाने आमचा मालक अय्याज कुरेशी आणि गाडीचालक अमीन शेख याने गाय आणि बैल संगमनेर येथे कत्तल करून ते मुंबईत पोहोच करण्यास सांगितले आहे, असे संमत केले.