कालीदेवीच्या प्रकोपामुळे ऋषीगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याचे ग्रामस्थांचे मत !  

ग्रामस्थांचे हे मत सरकार आता तरी विचारात घेईल का ?

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यातील चमोली येथे काही दिवसांपूर्वी हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयामुळे ६१ हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर १२५ हून अधिक जण बेपत्ता आहेत. यात २ जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. याविषयी स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, ‘कालीदेवीमुळे येथे कोणताही जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाला जात नाही. त्यामध्ये अडथळे निर्माण होऊन संबंधितांची हानी होते.’ ग्रामस्थ या देवीची आराधना करतात.

१. १५ ऑगस्ट २०११ या दिवशी लुधियान येथील उद्योगपती राकेश मेहरा यांच्यावर या ठिकाणी मोठे बोल्डर कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. या दिवशी त्यांच्याकडून विकत घेण्यात आलेल्या जलविद्युत संयंत्राच्या एका भागाचे परिक्षण होणार होते. त्या वेळी हा अपघात झाला. या नदीवर ६ वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण होणार होता. त्या वेळीही ग्रामस्थांनी ही देवीची चेतावणी असल्याचे म्हटले होते. ‘नदीच्या प्रवाहामध्ये कुणीही बाधा आणू नये’, अशी देवीची इच्छा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या नदीवरील प्रकल्पांची सातत्याने हानी होत आहे. वर्ष २०१६ मध्ये हा प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला होता.

कालीदेवीचा प्रकोप

२. येथील पर्यावरणवादी सोहनसिंह राणा यांनी सांगितले की, वर्ष १९९८ मध्ये पहिल्यांदा राज्याबाहेरील लोकांनी जलविद्युत प्रकल्पसाठी भूमी विकत घेतली तेव्हापासून येथे संकटे येत आहेत. यामुळे आज अशी स्थिती आहे की, रैणी गावात लोक रात्रीचे थांबण्यास घाबरतात. या गावातील दिनेश चंद्रा यांनी सांगितले की, आमची कालीदेवी या खोर्‍याचे रक्षण करते. आम्हाला सतत ती संकेत देत आहे. देवी निसर्गावरील आक्रमणाविषयी आनंदी नाही.