कोरोनावरील ‘पतंजलि’चे ‘कोरोनिल’ हे औषध प्रभावी असल्याचा योगऋषी रामदेवबाबा यांचा पुन्हा दावा !

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शोधप्रबंध प्रकाशित

आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे कोरोनाच्या काळात समोर आली होती. असे असतांना आयुर्वेदाला प्राधान्य देऊन हे औषधोपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे काम सरकारनेच करणे अपेक्षित होते ! आता तरी सरकारने ‘आत्मनिर्भर भारता’च्या पार्श्‍वभूमीवर योगऋषी रामदेवबाबा यांच्या शोधनिबंधाचा अभ्यास करून त्यात तथ्य असल्यास ते समाजापर्यंत पोचवणे आवश्यक !

डावीकडून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, बाबा रामदेव आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि योगपीठनिर्मित ‘कोरोनिल’ हे औषध कोरोनावर प्रभावी ठरल्याचा दावा स्वतः रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा केला आहे. यासाठी त्यांनी शोधप्रबंधही प्रसिद्ध केला आहे. या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. यापूर्वी आयुष मंत्रालयाने या औषधाला ‘कोरोनावरील औषध’ म्हणण्यास विरोध करत मान्यता देण्यास नकार दिला होता. नंतर योगऋषी रामदेवबाबा यांनी माघार घेतल्यावर ‘रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्‍या गोळ्या’ म्हणून मान्यता दिल्यावर तसा प्रसार करण्यास चालू करण्यात आले.

१. योगऋषी रामदेबबाबा यांनी प्रकाशित केलेल्या शोधप्रबंधामध्ये ‘कोरोनिल’ हे ‘कोविड-१९’वरील पहिले पुराव्यांवर आधारित औषध आहे’ असे म्हटले आहे. त्यासह औषधांसाठी असलेले CoPP-WHO GMP (सर्टिफिकेट ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट) प्रमाणपत्रदेखील मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेकडून दिले जाते.

(सौजन्य : Oneindia Hindi)

२. अद्यापही केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याकडून कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्यामुळे कोरोनावर उपचार म्हणून केवळ मान्यताप्राप्त ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा वापर होऊ शकणार आहे.