इंजेक्शन मागे २१ पैसे अधिक घेतल्याने औषध विक्रेत्यास १४ वर्षांनंतर ४० सहस्र रुपयांचा न्यायालयाकडून दंड !

नांदेड येथील घटना

‘एखादा खटला १४ वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो ! न्यायालयाकडून विलंबाने निकाल लागत असल्याने लोकांचा न्यायालयावरील विश्‍वास अल्प होत आहे. यासाठी खटल्यांचे निकाल तात्काळ होणे आवश्यक आहे !

नांदेड – इंजेक्शनच्या विक्रीत २१ पैसे अधिकचे आकारल्याच्या प्रकरणी शहरातील अपेक्स रुग्णालयाशेजारी असणार्‍या ‘श्रीराज फार्मा औषधी विक्रेते आणि त्यांचे ७ भागीदार’ यांना १४ वर्षांनंतर ४० सहस्र रुपये दंड आणि न्यायालय उठेपर्यंत शिक्षा मुख्य न्यायालय दंडाधिकारी न्यायमूर्ती सतीश हिवाळे यांनी सुनावली आहे. ११ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयाने हा निकाल दिला. श्री राज फार्मा आणि त्यांचे ७ भागीदार यांना दंडाची रक्कम तात्काळ भरण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर त्यांनी दंडाची रक्कम तात्काळ जमा केली.

(श्रीराज फार्मा औषधी विक्रेता आणि त्यांचे भागीदार यांनी अनेकांकडून असे अधिकचे पैसे घेतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ एका व्यक्तीने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याचे पूर्ण अन्वेषण केले असते, तर औषधी विक्रेत्यांना दंडासह कारागृहाची शिक्षा झाली असती. – संपादक)

श्रीराज फार्मा या मेडिकल दुकानातून शिवाजीनगर भागातील रहिवासी मुन्ना आबास यांनी आधुनिक वैद्यांच्या लेखी आदेशानुसार ‘फोर्टविन इंजेक्शन’ खरेदी केले होते. सदरील इंजेक्शनचा दर मूळ किमतीपेक्षा २१ पैसे अधिक दराने आरोपींनी विक्री केली. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे इंजेक्शन देयकाच्या पुराव्यासह १० मे २००७ या दिवशी तक्रार करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची नोंद घेऊन तत्कालीन औषध निरीक्षक राज बजाज गोपाल यांनी अन्वेषण केेले असता श्रीराज फार्मा आणि मेडिकल स्टोअर यांनी मुन्ना अब्बास यांच्याकडून एक इंजेक्शन मागे २१ पैसे अधिक घेतल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा अन् जीवनावश्यक वस्तू अधिनियमांंतर्गत न्यायालयाने श्रीराज फार्मा आणि त्यांचे भागीदार सदानंद मेडेवार, श्रीकांत पतंगे, अनुसया सूर्यवंशी, प्रकाश कदम, प्रदीप अग्रवाल, राहुल मेडेवार, मोहम्मद जियाउद्दीन यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते.