‘२८.५.२०२० या दिवशी महिला ज्योतिर्विद (पुणे) आयोजित दुसरी आंतरराष्ट्रीय महिला ज्योतिर्विद परिषद पार पडली. या परिषदेत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या विषयावर मला बोलायला सांगितले होते. त्या संदर्भात मी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘करिअर’ आणि धनयोग’ हा आजच्या स्पर्धात्मक युगातील व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. ‘दहावीनंतर मुलाला किंवा मुलीला कोणत्या शाखेला घातल्यास त्याला जीवनात यश मिळेल ? माझ्या पत्रिकेतील ग्रह पाहून कोणते करिअर निवडल्यास मला चांगली अर्थप्राप्ती होईल ?’, असे प्रश्न विचारणारे अनेक जातक आपल्याकडे येतात; कारण सध्याच्या स्पर्धात्मक काळात नोकरीत चाकोरीबद्ध जीवन जगण्याऐवजी व्यवसाय करण्याकडे मनुष्याचा कल वाढत आहे.
‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. दशम स्थान हे अर्थ त्रिकोणातील एक महत्त्वाचे स्थान आहे.
१. व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रह
अ. संपत्तीकारक शुक्र ग्रह
आ. दैवी पाठबळ लाभण्यासाठी गुरु ग्रह
इ. आत्मिक समाधान आणि राजाश्रय प्राप्त होण्यासाठी रवि ग्रह
ई. मानसिक समाधानासाठी चंद्र ग्रह
उ. ‘करिअर’मध्ये प्रगती होण्यासाठी शनि ग्रह
ऊ. बौद्धिक निर्णयासाठी बुध
हे सर्व ग्रह शुभ आणि बलवान असणे आवश्यक आहे.
२. व्यवसायात यश मिळण्यासाठी कुंडलीतील अर्थ त्रिकोण आणि लाभस्थान महत्त्वाचे आहेत !
व्यवसायात यश मिळण्यासाठी कुंडलीतील अर्थ त्रिकोण, म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच लाभ होण्यासाठी लाभ स्थान महत्त्वाचे आहे. २, ६, १० आणि ११ या चार स्थानांचे स्वामी एकमेकांच्या शुभयोगात असल्यास व्यवसायात यश मिळते. सप्तमेश, म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी शुभयोगात असल्यास व्यवसायिक भागीदार चांगले मिळतात.
२ अ. अर्थ त्रिकोण : कुंडलीतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने दर्शवणारी आकृती.
३. स्वतंत्र व्यवसाय करण्याचा दृढ विचार मनात येण्यासाठी आवश्यक कुंडलीतील स्थान आणि ग्रह
‘करिअर’ किंवा स्वतंत्र व्यवसाय यांचा विचार करतांना कुंडलीतील लग्न स्थान, लग्नेश, दशम स्थान, दशमेश, तसेच रवि आणि चंद्र या ग्रहांचे साहाय्य असणे महत्त्वाचे ठरते. लग्न स्थानावरून (प्रथम स्थानावरून) व्यक्तीची महत्वाकांक्षा ठरते आणि दशम स्थान, म्हणजे कर्मस्थान हे व्यक्तीची आव्हान पेलण्याची क्षमता दर्शवते. लग्नेश बलवान असेल, तर व्यक्ती कुठलेही आव्हान पेलण्यास सक्षम बनते. त्या व्यक्तीचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा विचार ठाम असतो. त्या स्वकर्तृत्वाने यश मिळवतात.
४. व्यवसायातील आव्हान पेलण्यासाठी आवश्यक कुंडलीतील स्थान आणि ग्रह
‘व्यक्तीत ‘करिअर’मध्ये नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता किती आहे ?’, हे पहाण्यासाठी कुंडलीतील ३, ६, १० आणि ११ ही उपचय (समृद्धी) स्थाने अभ्यासावी लागतात. उपचय स्थानांपैकी जे स्थान बलवान असेल, त्या क्षेत्रात व्यक्तीला विशेष यश मिळते, तसेच त्या संबंधित ग्रहांच्या दशेत व्यवसायास प्रारंभ होतो किंवा यश प्राप्त होते.
४ अ. कुंडलीतील उपचय स्थाने दर्शवणारी कुंडली
४ आ. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून कुंडली
५. कुंडलीतील उपचय स्थानांचे विश्लेषण
५ अ. तृतीय स्थान : तृतीय स्थानाला ‘पराक्रम स्थान’ असेही म्हणतात. तृतीय स्थान हे कर्म स्थानाचे षष्ठ स्थान आहे. षष्ठ स्थानावरून रिपू, म्हणजे शत्रू आणि रोग अभ्यासतात. यामुळे हाती घेतलेल्या कार्यात येणारे अडथळे आणि होणारे कष्ट दर्शवणारे हे स्थान आहे. तृतीय स्थान बलवान नसेल, तर पराक्रमाची पराकाष्ठा करण्याची त्या व्यक्तीची सिद्धता असावी लागते.
५ आ. षष्ठ स्थान : षष्ठ स्थान हे कर्म स्थानाचे भाग्य स्थान आहे. भाग्य स्थानावरून भाग्योदय, गुरुकृपा आणि ईश्वरी कृपा अभ्यासतात. यासाठी ‘करिअर करतांना आपल्या हाताखालची माणसे कशी असणार ? आपले शत्रू असणार का ? तसेच करिअरसाठी घ्यावे लागणारे ऋण मिळेल का किंवा घेतलेले ऋण लवकरात लवकर न्यून होईल का ? म्हणजेच व्यवसायात भाग्योदय कधी होईल ?’, हे अभ्यासण्यासाठी षष्ठ स्थान पहावे लागते. षष्ठेश बलवान नसेल, तर म्हणजे दशम स्थानाचे भाग्य अल्प पडत असल्यास व्यक्तीला हाताखालील माणसांशी नम्रतेने, सामोपचाराने वागून, तसेच घेतलेल्या ऋणाचा योग्य विनियोग करून व्यवसाय करणे आवश्यक असते.
५ इ. दशम स्थान : दशम स्थान, म्हणजेच कर्म स्थान. ‘कोणता व्यवसाय किंवा धंदा करावा ?’, याविषयी माहिती देणारे, तसेच सामाजिक प्रतिष्ठा दर्शवणारे हे स्थान आहे. ‘करीअर’ करण्याच्या प्रत्यक्ष विचाराला कृतींची जोड द्यावी लागते. त्यासाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.
५ ई. अकरावे स्थान : अकरावे स्थान, म्हणजे लाभ स्थान. दशम स्थानाचे हे धनस्थान असल्याने व्यवसायात मिळणारे धन आणि होणारे लाभ दर्शवणारे हे स्थान आहे. हे स्थान बलवान असल्यास लोकप्रियता मिळते.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.५.२०२०)
या लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/448032.html