‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

३ फेब्रुवारीच्या दैनिकातील लेखात आपण व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रह, व्यवसायात यश मिळण्यासाठी कुंडलीतील अर्थ त्रिकोण आणि लाभस्थान महत्त्वाचे असणे, स्वतंत्र व्यवसाय करण्याचा दृढ विचार मनात येण्यासाठी आवश्यक कुंडलीतील स्थान आणि ग्रह, व्यवसायातील आव्हान पेलण्यासाठी आवश्यक कुंडलीतील स्थान आणि ग्रह आणि कुंडलीतील उपचय स्थानांचे विश्‍लेषण यांविषयी पाहिले. आज लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

या पुर्वीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/447700.html


६. व्यवसायाचे कार्यक्षेत्र कसे निवडावे ?

दशम स्थानातील राशीच्या तत्त्वानुसार व्यवसायाचे कार्यक्षेत्र निवडता येते.

अ. दशम स्थानात मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्त्वाच्या राशी असल्यास लोखंड अन् धातू यांसंबंधित व्यवसायात यश मिळते.

आ. दशम स्थानात वृषभ, कन्या आणि मकर या पृथ्वीतत्त्वाच्या राशी असल्यास प्रशासन, अर्थ क्षेत्र, तसेच भूमी यांसंबंधित व्यवसायातून यश मिळते.

इ. दशम स्थानात मिथुन, तूळ आणि कुंभ या वायुतत्त्वाच्या राशी असल्यास शास्त्रीय संशोधनातील व्यवसायात यश मिळते.

ई. दशम स्थानात कर्क, वृश्‍चिक आणि मीन या जलतत्त्वाच्या राशी असल्यास द्रवपदार्थाच्या संबंधित व्यवसायातून

प्रगती होते.

सौ. प्राजक्ता जोशी

७. अर्थ त्रिकोणातील ग्रहांशी संबंधित व्यवसाय

अर्थ त्रिकोण आणि लाभस्थान यांपैकी बलवान असणार्‍या ग्रहाशी संबंधित व्यवसायात व्यक्तीला यश प्राप्त होते.

७ अ. रवि : तेजकारक रवि ग्रह बलवान असल्यास वडिलोपार्जित व्यवसाय, कारखानदार, सोनार, राजकीय क्षेत्र, सुतार इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

७ आ. चंद्र : माता, मन आणि जल यांचा कारक चंद्र ग्रह बलवान असल्यास परिचारिका, मत्स्य उद्योग, शेती, संगीत, गृहोपयोगी वस्तू, हॉटेल व्यवसाय, जहाज, नेव्ही, कलाकुसर, मानसोपचार तज्ञ, तसेच द्रवपदार्थ यांसंबंधित व्यवसाय इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

७ इ. मंगळ : मंगळ हा ग्रह बलवान असल्यास साहस, शौर्य आणि भूमी यांच्या संदर्भातील व्यवसायात यश मिळते, उदा. अग्निशमन दल, सिव्हिल इंजिनीयर, पदार्थविज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, सिक्युरिटी, सर्जन, शेती व्यवसाय, तसेच भाड्याने घर देणे इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

७ ई. बुध : बुध हा वाणी आणि बुद्धी कारक ग्रह आहे. बुध ग्रह बलवान असल्यास संगणक, पत्रकारिता, अधिवक्ता, प्रशासक, बँक, शेअर व्यापार, अध्यापन, लहान व्यवसाय, पौरोहित्य, टॅक्स कन्सल्टंट इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

७ उ. गुरु : गुरु हा ग्रह धार्मिक आणि शिक्षण या क्षेत्रांचा कारक ग्रह आहे. धर्मप्रसारक, लेखक, शिक्षणक्षेत्र, क्लासेस, कायदा क्षेत्र, प्रवक्ता, वित्त संस्था, अध्यापन, समाजशास्त्र, जीवनावश्यक वस्तू इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

७ ऊ. शुक्र : शुक्र हा कला, सौंदर्य, मनोरंजन यांच्याशी संबंधित क्षेत्रांचा कारक ग्रह आहे. महागड्या वस्तू, कपडे विक्रेता, हॉटेल, संगीत, सुगंधी द्रव्य, वाहन, मद्य, हिरे व्यापारी, वाहन विक्रेते, कलाकार, सौंदर्यवर्धनालय, चित्रपटगृह, मॅनेजमेंट अधिकारी, सुवर्णकार इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

७ ए. शनि : शनि हा ग्रह दीर्घोद्योग, लोखंड यांचा कारक ग्रह आहे. बांधकाम, ज्योतिषी, गॅरेज, लाकडी शिल्प, कारखानदार, इतिहास, संशोधक, न्यायाधीश, कोळसा, इंधन इत्यादी क्षेत्रांतील व्यवसायात यश मिळते.

८. ‘दशमेश ग्रह (दशम स्थानाचा स्वामी) कोणत्या स्थानात आहे ?’, यावर व्यवसायाचे स्वरूप आणि मिळणारे यश अवलंबून असणे

अ. प्रथम स्थानात दशमेश असल्यास नवीन व्यवसायात स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने प्रगती आणि वृद्धी होते. एखाद्या संस्थानिर्मितीचे कार्य हातून घडू शकते.

आ. द्वितीय स्थानात दशमेश असल्यास वडिलार्जित व्यवसायात, हॉटेल व्यवसायात किंवा घरगुती खानावळीत यश मिळते.

इ. तृतीय स्थानात दशमेश असल्यास लेखन, वक्तृत्व, प्रवास या माध्यमांतून यश मिळते.

ई. चतुर्थ स्थानात दशमेश असल्यास शेती, वाहन, मालमत्ता, भूमी यांसंदर्भातील व्यवसायात यश मिळते.

उ. पंचम स्थानात दशमेश असल्यास शैक्षणिक क्षेत्र, प्रकाशक, एजंट इत्यादी व्यवसायांतून यश मिळते.

ऊ. षष्ठ स्थानात दशमेश असल्यास निसर्गोपचार तज्ञ, सल्लागार इत्यादी व्यवसायांत यश मिळते.

ए. सप्तम स्थानात दशमेश असल्यास घरगुती व्यवसाय, साथीदाराच्या सहवासाने भागीदारीत व्यवसायामध्ये यश मिळते.

ऐ. अष्टम स्थानात दशमेश असल्यास व्यवसायात मंद गतीने प्रगती होते. मृत्यूसाठी लागणारे सामान विक्रेते किंवा विमा एजंट यांना यश मिळते.

ओ. नवम स्थानात दशमेश असल्यास व्यवसायात उत्तरोत्तर वाढ होते. स्वतंत्र व्यवसायात यश मिळते. अध्यात्मासंबंधित व्यवसायात यश मिळते.

औ. दशमेश दशमात असल्यास व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळते. ज्योतिषशास्त्रात यश मिळते. दशम स्थानाचा जो स्वामी असेल, त्या संबंधित व्यवसायात अधिक यश मिळते.

अं. एकादश स्थानात म्हणजे लाभ स्थानात दशमेश असल्यास मित्रांच्या साहाय्याने व्यवसायात यश मिळते. ‘मास मिडिया’, संगणक इत्यादी संबंधित व्यवसायात यश मिळते.

क. व्यय स्थानात, म्हणजे बाराव्या स्थानात दशमेश असल्यास प्रवास, धर्मदाय संस्था, रुग्णालय यांसंबंधित व्यवसायात यश मिळते.

९. ‘करिअर’मध्ये अपयश केव्हा येते ?

अ. कुंडलीतील भाग्य स्थान महत्त्वाचे स्थान आहे. दशम स्थानाचे ते व्यय स्थान आहे. व्यवसायातून होणारी हानी दर्शवणारे हे स्थान आहे. हे स्थान बलवान नसल्यास व्यक्तीला व्यवसायात हानी संभवते.

आ. लग्न स्थान किंवा लग्नेश दूषित असेल, तर व्यक्ती स्वतः प्रयत्न करण्यास न्यून (कमी) पडते. लग्न स्थान हे दशम स्थानाचे चतुर्थ स्थान, म्हणजे सुख स्थान आहे.

इ. पंचम स्थान हे दशम स्थानाचे अष्टम स्थान आहे. हे स्थान बलवान नसल्यास व्यक्तीला निवडलेल्या व्यवसायातून मानसिक समाधान मिळत नाही.

ई. दशमेश, म्हणजे दशम स्थानाचा स्वामी ६, ८ किंवा १२ या त्रिकस्थानात असेल, तर व्यवसायात संघर्ष होतो.

१०. ‘धन कसे मिळवावे ?’, याविषयी संत तुकाराम महाराज यांनी अभंगात सांगितले आहे,

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें ।
उदास विचारें वेच करी ॥

उत्तमचि गती तो एक पावेल ।
उत्तम भोगील जीव खाणी ॥

अर्थ : जनहो, तुम्ही चांगला व्यापार करून द्रव्य मिळवा आणि खर्च उदासीन विचाराने (विचारपूर्वक) करा. असे जो करील, त्याला उत्तम गती मिळेल आणि तो मनुष्ययोनीमध्ये जन्म घेऊन उत्तम भोग भोगील.’

 (समाप्त)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा.