समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्ररथाचा समावेश देहली येथील संचलनात न केल्याने निषेध

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रसिद्धीपत्रक

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्शवत असलेले राष्ट्रगुरु रामदासस्वामी यांचा समावेश २६ जानेवारी या दिवशी देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात करण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

वारकरी परिषदेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतभर मोगल राजवटीविरुद्ध शक्ती आणि भक्ती यांचा जागर करून हिंदूंची उदासीनता नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत रामदासस्वामी यांनी केले आहे. देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने समर्थ भक्तांची क्षमायाचना करावी.