भारत सरकारने भेट दिलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड

खलिस्तान समर्थकांवर संशय !

भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील डेव्हीसच्या सेंट्रल पार्कमध्ये उभारलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली. जवळपास ६ फूट उंचीचा आणि ३०० किलो वजनाचा हा पुतळा खाली पाडण्यात आला आहे. खालून हा पुतळा कापण्यात आला आहे, तसेच चेहर्‍याची तोडफोड करण्यात आली आहे. वर्ष २०१६ मध्ये भारत सरकारकडून हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा पुतळा का पाडण्यात आला, हे अद्याप चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांना समजलेले नाही.

डेव्हीसचे पोलीस प्रमुख पॉल डोरोशोव यांनी सांगितले की, हा पुतळा भारत सरकारने डेव्हीसला दिला होता. भारतीय अल्पसंख्यांकांच्या संघटनांनी यास विरोध केला होता, तसेच हा पुतळा हटवण्याची मागणीही केली होती.

खलिस्तानी संघटनांवर आरोप

‘फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’चे गौरांग देसाई यांनी सांगितले की,  भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कट्टर संघटनांनी, तसेच खलिस्तानी समर्थकांनी लोकांमध्ये द्वेषाचे वातावरण पसरवले आहे. या कृत्याची चौकशी ‘हेट क्राईम’ म्हणून केली जावी. हे कृत्य केवळ गांधीच नाही, तर भारतीय आणि भारतीय अमेरिकी लोकांविरोधात केलेला गुन्हा आहे.

खलिस्तान समर्थक असणार्‍या एका संघटनेने या कृत्यावर आनंद व्यक्त केला आहे. वर्ष २०२० च्या डिसेंबरमध्ये खलिस्तानी समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासासमोर असलेल्या गांधी यांच्या पुतळ्याची हानी केली होती.