‘आप’च्या जिल्हा परिषद सदस्याने बनावट ‘जात’ दाखला दिल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने अपात्रता याचिका प्रविष्ट

हेंजल फर्नांडिस

पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – ‘आप’चे गोव्यातील एकमेव जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांनी बनावट ‘जात’ दाखला देऊन जिल्हा पंचातय निवडणूक लढवल्याची तक्रार काँग्रेसच्या नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी एका याचिकेद्वारे केली आहे. जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांना अपात्र करावे, अशी मागणी या याचिकेद्वारे प्रशासकीय लवादाकडे करण्यात आली आहे. (हिंदु धर्मात जाती असल्यावरून इतर धर्मीय आणि तथाकथित सुधारक हिंदु धर्माला नावे ठेवतात. तसेच इतर धर्मांत जाती नाहीत, असे सांगितले जाते. मग जिल्हा पंचायत सदस्य ख्रिस्ती असतांना जात दाखला कुठून आला ? ख्रिस्ती धर्मातही जाती आहेत, असे यावरून समजायचे का ? म्हणजे अल्पसंख्य म्हणूनही आणि जातीवरूनही ख्रिस्ती धर्मीय लाभ उठवतात का ? – संपादक)

रॉयला फर्नांडिस यांनी जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांनी ‘च्यारी मेस्त’ असल्याचा केलेला दावा बनावट असल्याचे म्हटले आहे. ‘ख्रिस्ती च्यारी मेस्त’ यांना इतर मागासवर्गियांचा दर्जा देण्यास रॉयला फर्नांडिस यांच्याकडून आव्हान देण्यात आले आहे. जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांनी सुपुर्द केलेला ‘जात’ दाखला रहित करून त्याला अपात्र ठरवावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची १ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी होणार आहे.