सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे ! – भाजप महिला मोर्च्याची मागणी

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतांना भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या

कोल्हापूर, १८ जानेवारी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी मुंबई येथे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर प्रकरणी धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांची स्वीकृती दिली आहे. यावरून मुंडे यांना ५ अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची वस्तूस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोग आणि जनता यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी भाजप महिला मोर्च्याच्या वतीने १८ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ. नीता केळकर, भाजपा महानगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, ग्रामीण महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांसह भारती जोशी, सुलभा मुजुमदार, आसावरी जुगदार, मंगल निपाणीकर, लता बर्गे, शोभा कोळी, सुनिता सूर्यवंशी, धनश्री तोडकर यांसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सांगली येथील तहसील कार्यालयाच्या समोर अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सांगली – याच मागणीसाठी भाजप महिला आघाडी अध्यक्षा अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १८ जानेवारी या दिवशी सांगली तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यानंतर अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.