|
पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – जनभावनांचा आदर करत मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ जानेवारी या दिवशी केली. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सत्तरी तालुक्यातील सरपंच आणि जिल्हा पंचायत सदस्य, तसेच भाजपचे पदाधिकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या एका बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.
D/Live : Press Conference of CM Dr Pramod Sawant on IIT https://t.co/l332QVRGaZ
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 15, 2021
ते पुढे म्हणाले, ‘‘आयआयटी प्रकल्पासाठी मेळावली गावाची निवड करण्यामागे सरकारचा कोणताही स्वार्थ नव्हता, तर सत्तरी तालुक्याचा विकास करणे, हे सरकारचे ध्येय होते. मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला एका गटाचा विरोध होता आणि हा गट इतरांची दिशाभूल करत होता. आयआयटी प्रकल्पाचे लाभ सांगूनही लोकांना ते पटले नसल्याने शासनाला आता तेथील प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे; मात्र आयआयटी प्रकल्पासाठी पर्यायी जागेसंबंधी शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलीस अधिकार्यांनी आंदोलन करणार्या महिलांना अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. आंदोलनाच्या वेळी अनेक महिला पोलीस कर्मचारी दुखापतग्रस्त झाल्या आहेत. आंदोलनकर्त्यांवर प्रविष्ट केलेल्या तक्रारी मागे घेण्याची मागणी आली आहे आणि या प्रकरणांचा शासन अभ्यास करत आहे.’’