साधकांनो, समर्पितभावाने धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन संधीकालीन साधनेचा लाभ करून घ्या !

मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा पुनश्‍च शुभारंभ !

मकरसंक्रांतीनिमित्त सर्व साधकांना नमस्कार !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर (१४.१.२०२१ या दिवशी) सनातन संस्थेच्या प्रत्यक्ष समाजातील धर्मप्रसाराच्या कार्यास पुनश्‍च शुभारंभ होत आहे. कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता अनेक जिल्ह्यांतील स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.

गेले काही मास कोरोना महामारीमुळे बाह्यतः आपत्कालीन परिस्थिती असली, तरी हा काळ साधकांसाठी अनुभूतींचे पर्व ठरला. कोरोनामुळे भावी भीषण आपत्काळाची एक छोटीशी चुणूक अनुभवायला मिळाल्यामुळे साधना अधिकाधिक तळमळीने करण्याची जाणीव साधकांना झाली. ‘साधकाने सतत ‘सत्’मध्ये रहावे’, अशी जी शिकवण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना दिली आहे, ती साधकांनी या कठीण काळात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. दळणवळण बंदीच्या काळात प्रत्यक्ष प्रसार करण्यास मर्यादा आल्यानंतरही ऑनलाईन माध्यमांद्वारे समाजाला ईश्‍वराभिमुख आणि धर्माभिमुख करण्याचे कार्य अव्याहतपणे चालू राहिले. घरबसल्या अनेक साधकांनी आधुनिक माध्यमे शिकून घेऊन तळमळीने सेवा केली. या काळात साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली. एकूणच व्यष्टी आणि समष्टी साधनेचे संतुलन झाल्यामुळे साधकांसाठी हा काळ कृतज्ञताकाळ ठरला !

गुरुकृपेने आता मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर साधकांना कोरोनाविषयीच्या सर्व नियमांचे पालन करून पुन्हा प्रत्यक्ष धर्मप्रसार करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. सध्याचा काळ आपत्काळसदृश्य असला, तरी भावी आपत्काळाच्या तुलनेत तो आपत्काळातील संपत्’काळासारखा आहे. हा संधीकाळ साधनेसाठी पूरक असून या काळात आपण सर्वांनी समर्पितभावाने समष्टी साधना केल्यास त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ अधिक प्रमाणात लाभ होणार आहे. यासाठी सर्व साधकांनी ईश्‍वराने दिलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्यावा !

कोरोना महामारीत लाखो लोकांचे बळी गेले आणि कोट्यवधी भरडले गेले; पण ईश्‍वराच्या कृपेमुळे सर्व साधकजन या आपत्तीतूनही तरून गेले. ईश्‍वर आणि गुरु यांनी साधकांवर केलेल्या या अपार कृपेची परतफेड करणे शक्य नाही; पण साधक या नात्याने आपण किमान कृतज्ञता निश्‍चित व्यक्त करू शकतो. ही कृतज्ञता केवळ शब्दांतून व्यक्त होणारी नसावी, तर कृतीतून व्यक्त होणारी असावी. अर्थात् ईश्‍वर आणि गुरुमाऊली यांना कृतीतून आवडणारी कृतज्ञता म्हणजे ‘धर्मप्रसार’ ! आज त्यांच्याच कृपेमुळे दिसलेले हे दिवस त्यांच्याच चरणी अर्पण करण्याची संधी म्हणजे ‘धर्मप्रसार’ ! धर्मप्रसाराच्या या नव्याने चालू होणार्‍या कार्यात सहभागी होऊन या अमूल्य संधीचा लाभ घेऊन गुरुकृपेसाठी पात्र होऊया !

यासाठी ‘तुम्हा सर्वांना बळ मिळो’, ही गुरुचरणी प्रार्थना !

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०२१)ॐ