‘माझे वडील पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा, वय ९२ वर्षे) आमच्या ईश्वरपूर, जिल्हा सांगली येथील घरी असतांना त्यांचे संतपद घोषित झाले. ते संत झाल्यावर काही मास घरीच होते. जून २०२४ मध्ये पू. आबा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आले. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

१. प.पू. डॉक्टरांच्या भेटीसंदर्भात पुनःपुन्हा बोलणे
पू. आबा त्यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. डॉक्टरांशी झालेल्या भेटीच्या संदर्भात साधकांना पुनःपुन्हा सांगत असतात. ते प्रत्येक वेळी साधकांना नव्या उत्साहाने आणि आनंदाने प.पू. डॉक्टरांच्या भेटीविषयी सांगतात. साधकांना ‘पू. आबांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते.

२. स्थिर, शांत आणि आनंदी
पू. आबा प्रत्येक स्थितीत स्थिर, आनंदी आणि शांत असतात. प्रत्यक्षात ‘व्यक्तीला उतारवयात स्वतःचे स्वतः करणे कठीण होते’, हे स्वीकारता येत नसते. समाजातील व्यक्तींची बर्याच गोष्टींमध्ये चिडचिड होत असते.
३. सहजावस्थेत रहाणे

‘पू. आबा नेहमी सहजावस्थेत असतात’, असे मला जाणवते. त्यांना ‘विशिष्ट कृती ठरलेल्या वेळीच व्हायला हवी किंवा एखादी वस्तू हवी’, असे वाटत नाही. पालटलेल्या परिस्थितीचा पू. आबांच्या मनावर परिणाम होत नाही. ते प्रत्येक परिस्थिती सहजतेने आणि आनंदाने स्वीकारतात.
४. लहान बहिणीचे निधन झाल्याचे समजल्यावर स्थिर असणे
१२.२.२०२५ या दिवशी पू. आबांची लहान बहीण शकुंतला जाधव (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. मी ‘याविषयी पू. आबांना कसे सांगू ? त्यांना स्वीकारता येईल कि नाही’, असे मला वाटले. मी त्यांना त्यांच्या बहिणीचे निधन झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी ते सहजतेने स्वीकारले. त्यांनी देवाला प्रार्थना केली, ‘देवा, तिला पुढची गती मिळू दे.’ त्यांनी मला सांगितले, ‘‘जन्माला आलेला प्रत्येक माणूस जाणारच असतो.’’ त्यानंतर तो विषय त्यांच्याकडून पूर्ण विसरला गेला.
५. पू. आबांमध्ये जाणवलेले पालट
५ अ. शारीरिक त्रास उणावणे : वृद्धावस्थेत शारीरिक त्रास वाढत जातात; मात्र पू. आबांचे वयोमानानुसार होणारे त्रास प.पू. डॉक्टरांच्या कृपेने हळूहळू उणावले. पू. आबा आता स्थिर झाले आहेत.
५ आ. व्यायामप्रकार करणे : सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणारे वयस्कर साधक सेवा झाल्यावर १५ मिनिटे हाता-पायांचे व्यायाम करत असतात. तेव्हा मी पू. आबांना ४ चाकांच्या आसंदीतून (व्हीलचेअरमधून) व्यायामासाठी घेऊन जातो. ते चाकाच्या आसंदीत बसूनच सर्व व्यायामप्रकार करण्याचा प्रयत्न करतात. पू. आबांची इच्छा आणि चैतन्य यांमुळे ते व्यायामप्रकार करतात.
५ इ. मी त्यांना ४ चाकांच्या आसंदीतून (व्हीलचेअरमधून) आरतीसाठी ध्यानमंदिरात घेऊन जातो.
५ ई. सतत नामजप करणे : पूर्वी ते वेगळा असा नामजप करत नव्हते. सांप्रदायिक साधनेत सांगितल्याप्रमाणे त्यांची साधना चालू होती. ते वारकरी संप्रदायासंदर्भातच अधिक बोलायचे. आता त्यांचे लक्ष नामजपाकडे अधिक असते. ते अंतर्मुख होऊन सतत ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतात. त्यांचा रात्री झोपेतही नामजप चालू असतो. ‘ते नामजपाशी एकरूप झाले आहेत’, असे मला वाटते.
५ उ. निवासाच्या खोलीतील चैतन्य वाढणे : पू. आबा निवासाला असलेल्या खोलीतही आता चैतन्य जाणवते. मी खोलीत गेल्यावर माझा नामजप चालू होतो. ‘पू. आबांची खोली, म्हणजे एक निर्गुण पोकळीच आहे’, असे मला वाटते.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मला पू. आबांची सेवा मिळाली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.३.२०२५)