१४ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात प.पू. डॉक्टर यांच्या सहवासात मुंबई सेवाकेंद्रात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात शिकायला मिळालेली काही सूत्रे आणि सेवाकेंद्रात प्रथमच आलेल्या साधकाने अनुभवलेली प.पू. डॉक्टरांची प्रीती याविषयी लिखाण पाहिले. आज आपण प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या विविध सेवांतून डॉ. दुर्गेश सामंत यांची झालेली घडण्याची प्रक्रिया, तसेच त्यांना प.पू. डॉक्टरांची जाणवलेली काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(भाग ५)
आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा साधनाप्रवास
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902629.html

८. सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !
८ ई ३. साधकाला सेवा देऊन त्याचे ‘साधक’ म्हणून गुणधर्म पारखणे : लिखाण (‘प्रूफ’) पडताळणे मला नवीन होतेच; परंतु त्याच वेळी ‘एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर प्राथमिक परिचय झाल्यानंतर वेळ वाया न घालवता काहीतरी सेवा करायला मिळणे’, हा भागही मला नवीन होता. ‘प.पू. डॉक्टर सेवाकेंद्रात आलेल्या प्रत्येकाचा वेळ सेवेसाठी वापरून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यातून त्याला शिकवतात आणि त्याला सेवेची संधी देतात. त्याच वेळी त्याचे ‘साधक’ म्हणून गुणधर्म कसे पारखतात ?’, हे मला शिकायला मिळाले.
८ ई ४. साधकांचा स्वतःच्या कुटुंबियांशी परिचय करून देणे : सेवाकेंद्रात गेल्यावर प.पू. डॉक्टरांनी मला त्यांच्या वडिलांना भेटायला सांगितले. मी पूजनीय आठवले आजोबांचे (‘प.पू. बाळाजी वासुदेव आठवले यांचे) दर्शन घेतले. ते अत्यंत वृद्ध होते, तरी चांगले स्पष्ट बोलत होते. त्यांनी मला इंग्रजी भाषेत केलेल्या त्यांच्या कविता दाखवल्या. कवितेतील प्रत्येक पंक्तीमध्ये पहिले अक्षर जोडून घेतले, तर काही विशिष्ट शब्द बनत होते. त्यांचे हे प्राविण्य पाहून मला विशेष वाटले.
प.पू. बाळाजी वासुदेव आठवले यांनी केलेली कविता
कविता
(डॉ. कविता प्रशांत देवस्थळी, पू. अप्पांची मुलगी आणि प.पू. बाळाजी आठवले यांची नात)
नामाचे महत्त्व
करू नका विपुल धनाची आस ।
सदा करा सोऽहं जप ।।
विवेक जाते घेऊन हाती ।
काम-क्रोध-मदाचे पीठ करी ।।
ताप संसारसागराचा ओलांडण्या ।
सोऽहं नावेत बसा ।।
ते अत्यंत शांत होते आणि नेमकेच बोलायचे. त्यांचा शांतपणा आणि नेमकेपणा माझ्या लक्षात राहिला. प.पू. डॉक्टरांनी मला त्यांच्या मातोश्रींशीसुद्धा (पू. ताई, म्हणजे पू. नलिनी बाळाजी आठवले यांच्याशी) बोलायला सांगितले. मी त्यांना जाऊन भेटलो. पूजनीय ताई पुष्कळ बोलक्या होत्या. त्यांनी माझी चौकशी केली. त्यांचा बोलकेपणा आणि सहजपणा माझ्या लक्षात राहिला. हे सर्व प.पू. डॉक्टरांनी तटस्थपणाने आणि ‘आम्ही त्यातून काही शिकावे’, यासाठी केले होते. तेव्हा त्यांनी मला ‘या दोघांना भेटून कसे वाटते, ते पहा ?’, असेही सांगितले होते.
८ ई ५. साधकाला उद्वाहनापर्यंत (लिफ्टपर्यंत) सोडायला जाणे : आम्ही सेवाकेंद्रातून निघालो. तेव्हा प.पू. डॉक्टर आम्हाला उद्वाहनापर्यंत (लिफ्टपर्यंत) सोडायला आले. प.पू. डॉक्टर सेवाकेंद्रात आलेल्या प्रत्येक साधकाला उद्वाहनापर्यंत (लिफ्टपर्यंत) सोडायला जात असत, हे विशेष होते.
८ ई ६. प.पू. डॉक्टरांनी डॉ. दुर्गेश सामंत यांना लिखाणाला पद्यातून मथळा देण्याऐवजी सर्वसामान्य व्यक्तींना समजतील, असे गद्यातील सोपे मथळे देण्यास सांगणे आणि नंतर त्यांच्या सेवेतील एकाग्रतेविषयी कौतुकही करणे : एकदा मी लिखाणातील एका सूत्राचा मथळा पालटला. तो मथळा गद्य स्वरूपाचा आणि गुरूंची महती सांगणारा होता. त्या ठिकाणी मी पेन्सिलने गुरूंची महती; म्हणून प.पू. बाबांच्या भजनातील ३ शब्दांची एक पंक्ती लिहिली. प.पू. डॉक्टरांकडे ते लिखाण वाचायला गेल्यानंतर त्यांनी पूर्वीचाच मथळा ठेवला आणि सांगितले, ‘‘काव्यात्मक मथळे सामान्यांना समजणे कठीण असते. गद्यातील सोपे मथळे समजतात.’’ त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी सौ. नंदिनीकडे ‘आसपास आवाज चालू असतांनाही दुर्गेशने एकाग्रतेने सेवा केली’, असे माझ्याविषयी प्रशंसोद्गार काढले. ते पाहून ‘त्यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी याची नोंद घेतली’, याबद्दल मला आश्चर्य वाटले; कारण मी दुसर्या सदनिकेत बसून हे पडताळत होतो.
८ ई ७. डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी दिवाळीच्या निमित्ताने सर्व साधकांना उत्तम भेटवस्तू देणे : जुलै ते ऑक्टोबर १९९८ मी सेवाकेंद्रात सेवेसाठी रहायला होतो. ऑक्टोबरमध्ये दिवाळी जवळ आली असल्याने डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी माझ्यासाठी एक चांगल्या प्रतीचा सिल्कचा कुर्ता आणि पायजमा स्वतः बाजारात जाऊन आणला आणि मला भेट दिला. असे त्यांनी इतर साधकांसाठीही केले.
८ उ. सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांनी सेवेतून असे घडवले !

८ उ १. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सेवेमुळे मनामध्ये एक प्रकारची लिखाणाची बैठक तयार होणे आणि नंतर ती विकसित होत जाणे : प.पू. डॉक्टरांनी चालू केलेल्या उपक्रमांपैकी पुष्कळ उपक्रमांमध्ये प्रथमपासूनच माझा अल्पाधिक प्रमाणात सहभाग होता. विशेष करून दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील सेवा. यामुळे माझ्या मनात एक प्रकारची लिखाणाची बैठक सिद्ध (तयार) झाली आणि नंतर ती विकसित होत राहिली. ‘विविध विषयांना कसे सामोरे जायचे ? प्रसंगांचा अभ्यास कसा करायचा ? जगामध्ये चाललेल्या घडामोडींकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसे पहायचे ?’, हे या सेवेतून मला शिकायला मिळाले.
८ उ २. विविध सेवा आणि साधना यांच्या निमित्ताने अनेक साधक अन् समाजातील व्यक्ती यांच्याशी संपर्क येत राहिल्यामुळे त्यातून माझी शिकण्याची प्रक्रिया चालू झाली.
८ उ ३. अनेक प्रकारच्या सेवा मिळाल्यामुळे साधकाचे राजसिक मन अनेक प्रकारच्या सेवा आणि उपक्रम यांत गुंतून राहून शिकत रहाणे : आज मी क्षणभर कल्पना केली की, मला एकाच सेवेमध्ये थांबून रहावे लागले असते आणि नंतर ‘त्या सेवेमध्ये काहीच नाविन्य नाही’, असे माझ्या मनात झाले असते, तर माझे मन साधनेत गुंतून राहिले नसते; कारण मुळातच माझे मन रज-तम प्रधान असल्यामुळे ते एका गोष्टीत समाधानी न रहाता त्याला अनेक गोष्टींमध्ये रस घ्यावासा वाटतो. त्याला अनेक गोष्टी समजून घ्याव्याशा वाटतात आणि ‘प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी करावे’, असे वाटते. त्यामुळे अनेक प्रकारच्या सेवा मिळाल्यामुळे माझे राजसिक मन अनेक प्रकारच्या सेवा आणि उपक्रम यांत गुंतून राहिले आणि शिकत राहिले.
८ उ ४. आश्रम आणि साधक यांचा सत्संग मिळाल्याने मन अन् बुद्धी यांची चिंतन करण्याची प्रक्रिया चालू रहाणे : विविध सेवांमध्ये येणारे अनुभव त्यामधून शिकायला मिळणारे पैलू यांमुळे मन आणि बुद्धी यांची चिंतन करण्याची प्रक्रिया चालू रहाते. आश्रमात राहिल्याने, तसेच संत आणि साधक यांच्या सत्संगात राहिल्याने बुद्धीला अध्यात्माचे परिमाण लाभते. त्यामुळे ती सेवा अधिक खोलवर जायला साहाय्य होते. प.पू. डॉक्टरांनी मला आश्रम आणि असंख्य साधक यांचा सत्संग मिळवून दिला.
८ उ ५. प.पू. डॉक्टरांनी अनेक संतांचे केलेले स्वागत आणि त्यांचे त्या संतांशी प्रत्यक्ष अन् त्यांच्या अपरोक्ष वागणे यांतून पुष्कळ शिकायला मिळणे : प.पू. डॉक्टर स्वतः अनेक संतांना भेटत असत. नंतर काही संत आश्रमातच राहू लागले. तेव्हा मला अनेक संतांचे जवळून दर्शन झाले. प.पू. डॉक्टरांनी अनेक संतांचे केलेले स्वागत पाहून मला पुष्कळ शिकायला मिळाले. ‘प.पू. डॉक्टर त्या संतांशी प्रत्यक्ष आणि त्यांच्या अपरोक्षही कसे वागतात ?’ ते पहायला मिळाले, उदा. कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु जयेंद्र सरस्वती आश्रमात येऊन गेले होते. तेवढीच प.पू. डॉक्टरांची त्यांच्याशी भेट झाली होती. पुढे अकस्मात् ‘शंकराचार्यांना अटक करण्यात आली आहे’, असे वृत्त आले. त्या वेळी लगेचच प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या नावे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेखन करून या अटकेचा प्रखर शब्दांत निषेध केला. त्या वेळी तत्परतेने निषेध करणार्या मोजक्या अपवादांमध्ये प.पू. डॉक्टर होते.
८ ऊ. प.पू. डॉक्टर यांची जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये
८ ऊ १. नीटनेटकेपणा : प.पू. डॉक्टर यांच्या सर्व वस्तू नीट लावून ठेवलेल्या असत. त्यांनी पटलावरील लहान कागदांवर विविध मंडळींना देण्यासाठी निरोप लिहून ठेवलेले असत. इतरही अनेक चिठ्ठ्या वर्गीकरण करून पटलावर लावून ठेवलेल्या असायच्या. प्रत्येक चिठ्ठीवर ‘ती कुणासाठी आहे’, हेही लिहिलेले असे.
८ ऊ २. काटकसरी वृत्ती : त्यांनी अनेक चिठ्ठ्या पेन्सिलने लिहिलेल्या असायच्या. यासाठी पाठकोरा कागद किंवा मोठ्या कागदांची ‘मार्जिन’ची पट्टी वापरलेली असायची. थोडक्यात कोणत्याही कागदाचा कोणताही भाग वाया घालवला जात नसे. छापील कागदावर जेवढी जागा रिकामी असेल, ती पूर्ण वापरली जात असे. एखाद्या कागदाचे काम पूर्ण झाल्यावर त्यातील मजकुरावर ते एक मोठी रेघ मारत. ही कार्यपद्धत त्यांनी तेथे रुजवली होती. त्यामुळे तसे सर्व कागद आपोआप एका ठिकाणी जमा व्हायचे.
८ ऊ ३. सुनियोजित दिनक्रमात व्यस्त असूनही भेटायला आलेल्या व्यक्तीला वेळ देणे : प.पू. डॉक्टरांच्या महाप्रसाद घेणे, लिखाण करणे आणि विश्रांती घेणे, या वेळा ठरलेल्या होत्या. असे असले, तरी त्यांना कुणी भेटायला आल्यास किंवा कुणी काही विचारायला गेले, तर ते हातातील सर्व कामे बाजूला ठेवून त्या व्यक्तीला वेळ देत असत. ते प्रत्येकाशी सहजतेने बोलत असत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ‘आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपण संत आहोत’, असे कधीच जाणवत नसे. त्यांचे बोलणे सहज असले, तरी ते नेमके असायचे.
८ ऊ ४. एका सदनिकेतून दुसर्या सदनिकेत जाऊन साधकाला निरोप देणे : प.पू. डॉक्टर ज्या सदनिकेत सेवा करत असत, तेथून काही अंतरावर त्यांची दुसरी एक सदनिका होती. त्या दुसर्या सदनिकेत साधक सेवा करण्यास बसत असत. दुसर्या सदनिकेतील साधकाला काही सांगायचे असल्यास प.पू. डॉक्टर आपल्या सदनिकेतून तेथपर्यंत जाऊन त्या साधकाशी बोलत. तेथे दोन्ही सदनिकांमध्ये जोडणारा अंतर्गत दूरभाष होता किंवा ते दोन सदनिकांमध्ये जा-ये करणार्या कोणत्याही साधकाकडून निरोप देऊ शकत होते. यामध्ये त्यांचा साधेपणा दिसून येतो.
(क्रमश:)
आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)
__________________________________________________
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/903396.html