‘बर्ड फ्ल्यू’मुळे मुरुंबा (जिल्हा परभणी) गावात संचारबंदी लागू

पोलीस बंदोबस्त तैनात

परभणी – तालुक्यातील मुरुंबा गावात ४ दिवसांपूर्वी ‘बर्ड फ्ल्यू’मुळे अनुमाने ८०० कोंबड्यांच्या मृत्यू झाला. गेल्या २ दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. परिणामी हा संसर्गजन्य आजार पसरू नये; म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात संचारबंदी लागू केली आहे. परिसरातील एक किलोमीटरच्या केंद्रावरील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

साधारणपणे २ सहस्र २०० लोकसंख्या असलेले मुरुंबा हे गाव परभणीपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथे पडताळणीसाठी पाठवल्यावर सर्व कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्ल्यू’नेच झाल्याचे स्पष्ट झाले.

संचारबंदीच्या अंतर्गत गावातील प्रत्येक चौकात फलक लावून ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. संचारबंदीची कार्यवाही करण्यासाठी गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांकडून गावातील नागरिकांना बाहेर येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गावातील नागरिक या परिस्थितीमुळे दहशतीखाली आहेत. एकीकडे कोरोना या संसर्गजन्य आजाराचे संकट असतांना पुन्हा हा नवीन संसर्गजन्य आजार डोक्यावर घोंगावत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.