मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक आणि भाषाभ्यासक भालचंद्र नेमाडे यांच्या वर्ष २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात ‘लमाण समाजाच्या महिला हडप्पा काळापासून पुढे वेश्याव्यवसाय करत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या उल्लेखामुळे भावना दुखावल्याविषयी रमेश खेमू राठोड यांनी तक्रार दिल्याने पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे १० वर्षांपूर्वीच्या या कादंबरीची चर्चा पुन्हा एकदा होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. लिखाणात शैली आणि वैचारिकता हे दोन वेगळे भाग असतात. बर्याच आधुनिकांना ‘त्यांची लिखाणाची शैली आवडते; म्हणून त्यांचे लिखाण आवडते’, असे ते म्हणतात; परंतु कुठल्याही लिखाणात ‘विचार’ हा अधिक महत्त्वाचा असतो. विचार चुकीचा असेल, तर शैली कितीही आकर्षक असली, तरी त्याचा काय उपयोग ? आणि त्यांची जी शैली आकर्षक वाटते, त्याचाही सखोल विचार केला, ती निखळ आनंद देणारी आहे का, हेही पहावे लागेल.
वास्तवापासून दूर नेणारा द्वेष
या मोठ्या कादंबरीतील दोन छोटी उदाहरणे पाहूया. समाजातील शोषणकर्त्यांना नावे ठेवतांना ‘खंडेराव’ नावाचा नायक जागोजागी ब्राह्मणद्वेष्टी विधाने करतो. वास्तव काय आहे ? प्रत्यक्षात गेली कित्येक दशके ब्राह्मण समाज कुणाचेही शोषण करत नाही; किंबहुना आरक्षण आणि समाजातील विद्रोहींच्या ब्राह्मणद्वेष्टेपणामुळे त्यांच्यावरच अन्याय होत आहे. मग यातून नव्या पिढीला काय शिकायला मिळणार ? हिंदूंच्या समृद्ध संस्कृतीचा शोध घ्यायचाच होता, तर नेमाडे यांनी ‘ब्राह्मणांच्या घराघरात जाऊन किती जणांच्या पूर्वजांनी किती जणांवर अन्याय केला’, हे शोधायला हवे होते. अन्यथा यात येणारा अनाठायी ब्राह्मणद्वेष हा प्रस्थापित विद्रोही लेखनपद्धतीचा भाग होता, असेच कुणालाही वाटेल. ‘नेमाडे यांना ‘देशीवाद’ रुजवायचा आहे’, असे त्यांचे समीक्षाकार म्हणतात. नेमाडे यांना खरोखरच देशीवाद रुजवायचा असेल, तर त्यात ‘जाती’तील ‘द्वेष’ बसत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. नेमाडे यांनी सिंधु संस्कृतीपासूनचा अभ्यासच यात करायला घेतला आहे, तर ‘प्राचीन भारतीय संस्कृतीत जाती नाहीतच; वर्ण आहेत आणि ‘त्यात द्वेष असतो’, याचा शोध गेल्या २५० वर्षांतील आहे’, हे त्यांना ठाऊक नाही, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.
यात कृषीसंस्कृतीला ‘अप्पलपोटी’ म्हटले आहे; कारण काय तर ती म्हणे ‘वन आणि भटक्या संस्कृतीच्या पोटावर पाय देऊन आलेली आहे.’ हे विधान किती हास्यास्पद आहे. ‘माणसांची उत्क्रांती माकडापासून झाली’, हा डार्विनचा सिद्धांत जितका हास्यास्पद आहे; तितकेच हे आहे. कादंबरीचे सहाशेहून अधिक पानांचे कागद वने पाडूनच मिळवली आहेत ना ? प्राचीन काळापासून येथे प्रगत कृषीसंस्कृती निर्माण होती; म्हणून नेमाडे स्वतः आज लेखक म्हणून मिरवू शकत आहेत. व्यापारी झालेल्या शेतकर्यांनी भूमी लुबाडल्या असतील, तर सरसकट कृषीसंस्कृतीविषयी असे विधान करून कसे चालेल ? असो.
पाश्चात्त्य मानसिकतेने ‘धर्म’ कसा शोधणार ?
हिंदूंमध्ये जातीभेद असून त्यातील ‘वरिष्ठ कनिष्ठांवर अन्याय करतात’, असे म्हणणे हे पुरोगामी असण्याचे एक व्यवच्छेदक (इतरांपासून वेगळेपण दर्शवणारी) लक्षण आहे. ‘एकीकडे पुरोगामी विचारांची पार्श्वभूमी ठेवायची आणि दुसरीकडे परंपरेचा किती अभ्यास आहे, असे दाखवायचे’, ही दांभिकता झाली. परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करायला त्यांच्याशी एकरूप व्हावे लागते. हिंदु धर्म आणि हिंदूंना समजून घ्यायला नेमाडे यांनी आधी हिंदूंसारखे साधनारत व्हायला हवे, तर त्यांना हिंदु म्हणजे काय, हे थोडे तरी समजेल. संत तुकाराम यांना समजून घ्यायला स्वतः थोडीतरी साधना करावी लागते; केवळ भाषा समृद्ध आहे म्हणून त्यांच्या अभंगांचे अर्थ लावणे, हे फुकाचे आहे. त्यामुळे हिंदु देवता, धर्म, संत, संस्कृती, परंपरा हे अशा तथाकथित साहित्यिकांपेक्षा सामान्य भाविक हिंदूलाच अधिक चांगले कळलेले असतात. या गोष्टी आतून न अनुभवता किंवा त्यांच्याशी समरस न होता केवळ यांच्याविषयी शब्दच्छल करणे म्हणजे ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’ प्रकार होतो. त्यामुळे त्यातील जिवंतपणा हरपतो. नेमाडे यांच्या या कादंबरीच्या संदर्भातही हेच झाले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांपैकी अनेकांनी ही ‘कादंबरी जुन्या संदर्भाची आहे’, ‘प्रसिद्ध कशाला केली ?’, ‘आवडली नाही’ अशा प्रकारचे अभिप्राय नोंदवले.
नेमाडे यांनी मध्यंतरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा हद्दपार करण्याचा विचार मांडला होता. त्यांना खरोखरच तसे वाटत असेल, तर इंग्रजी विचारांनी प्रभावित वैचारिकताही त्यांनी त्यागायला हवी; कारण इंग्रजी शिक्षण म्हणजे शेवटी इंग्रजी वैचारिकताच आहे. स्वतः नेमाडेही प्रस्थापित साहित्य व्यवस्थेला नावे ठेवत शेवटी त्याचाच एक भाग झाले आहेत नव्हे का ? आता त्यांनाही प्रस्थापित पुरोगामी कुणी म्हटले, तर चूक नव्हे. पुरोगाम्यांच्या लिखाणातून स्वसंस्कृतीविषयीचा केवळ आकस नव्हे, तर उपहासात्मकता, हीन लेखणे, तुच्छता, द्वेष आदी सारे प्रगट होते. शेवटी नेमाडे यांनी कितीही स्वमातीच्या मुळाकडे जाण्याचा चिकाटीने प्रयत्न केला, तरी त्याचे पोषण पाश्चात्त्य विचारांवरच झाले आहे, हे नाकारून कसे चालेल ? त्यामुळे ‘जिथे समृद्धता असते, तिथे अडगळ फार काळ टिकत नाही, हे लक्षात घ्यायला नेमाडे न्यून पडले’, असेच म्हणावे लागेल.
नेमाडे हे प्रसिद्ध लेखक असल्याने ते जो विचार मांडतील, त्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे त्यांचे दायित्व अधिक आहे. आपल्याला वाटलेले केवळ मांडत जाणे आणि समाजाला योग्यायोग्यतेच्या बुचकळ्यात पाडणे म्हणजे चांगला लेखक असणे नव्हे. वास्तव मांडणे, हे योग्य आहे; पण म्हणून योग्य किंवा अयोग्य ही बाजू लेखकानेही ठामपणे घेतली पाहिजे आणि समाजाला दिशा दिली पाहिजे. असे लिखाण समाजावर दीर्घकाळ परिणाम करत रहाते. हिंदु समाजात घडणार्या अयोग्य गोष्टी, अपप्रकार, दांभिकता सांगू नये, असे अजिबात नाही; पण ते सांगण्याची लेखकाची पद्धत अशी होते की, कुणाही युवा पिढीतील वाचकाला ‘हिंदु धर्मच वाईट आहे’, असे सहज वाटू शकेल. त्याला आक्षेप आहे आणि राहील. त्यामुळेच अशा लेखकांना ‘ज्ञानपीठ’ मिळणे खटकत रहाते.