महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही ! – पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार

मुंबई – राज्यातील विविध जिल्ह्यांत पक्ष्यांची पडताळणी केली असून राज्यात बर्ड फ्लू अस्तित्वात नाही, असे विधान पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. ठाणे येथे १६ पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूची शंका निर्माण झाली होती; मात्र त्या पक्ष्यांची बर्ड फ्लूची केलेली पडताळणी नकारात्मक आली. राज्यातील अनेक ठिकाणच्या पक्ष्यांच्या घशातील द्रव, रक्तजल, तसेच विष्ठा यांचे नमुने यांची पडताळणी करण्यात आली. तीही नकारार्थीच आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायसिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीजेस, भोपाळ या राष्ट्रीय संस्थेने मृत्यूसाठी बर्ड फ्लू रोगासाठी ‘एच् ५ एन् १ स्ट्रेन’ कारणीभूत असल्याचे निदान केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अधिक सतर्कपणे पडताळणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सुनील केदार म्हणाले की, कुक्कुटपालक, तसेच अंडी आणि मांस खाणार्‍या नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही. तसेच स्थलांतरित होणारे जंगली पक्षी, कावळे, परसातील कोंबड्या यांचा किंवा व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन होणार्‍या ठिकाणी असाधारण स्वरूपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशूवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा.