मुंबई, देहली आणि अन्य ठिकाणाहून वाहतूक प्रस्तावित
वेंगुर्ले – चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे. मुहुर्ताचे प्रवासी विमान ७० प्रवाशांना घेऊन जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात मुंबई येथून सिंधुदुर्गात दाखल होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.
चिपी विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळाची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकार्यांसमवेत खासदार राऊत यांनी बैठक घेतली. त्यानंतर खासदार राऊत म्हणाले, ‘‘देहली येथून नागरी विमान उड्डाण संचालक जनरल समिती १० जानेवारीला जिल्ह्यात येणार आहे. २० जानेवारीपर्यंत केंद्राची अनुमती मिळेल. अनुमती मिळाल्यानंतर दुसर्या दिवशीपासून आरक्षण चालू करण्यात येईल. तसेच विमान वाहतूक आस्थापनाच्या वतीने मुंबई ते सिंधुदुर्ग अशी वाहतूकही चालू होईल. त्यानंतर इंडिगो आस्थापनाच्या माध्यमातून मुंबई, देहली आणि इतर ठिकाणी प्रवासी वाहतूक प्रस्तावित आहे.’’
विमानतळासाठी राज्य सरकारने पाठपुरावा केला नाही ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री, भाजप
‘चिपी विमानतळाला आवश्यक असलेल्या अनुमती माझ्याच पाठपुराव्यामुळे मिळाल्या आहेत. राज्य सरकारने म्हणावा तसा पाठपुरावा केला नव्हता. चिपी विमानतळाचे उद्घाटन २६ जानेवारीला होणार याविषयी मला ठाऊक नाही; परंतु ३० जानेवारीपर्यंत याचे काम पूर्ण होईल. उडान योजनेच्या अंतर्गत या विमानतळाचा समावेश असल्याने या ठिकाणाहून कायम विमान वाहतूक होणार आहे’, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.