उद्ध्वस्त मंदिराच्या निमित्ताने… !


पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात शेकडो धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या एका मंदिराची तोडफोड करत ते पेटवून दिले. भारतात हिंदूंच्या प्रमुख मंदिरावर बांधलेली मशीद पाडण्यात येते, तेव्हा शेकडो हिंदूंच्या रक्ताने यमुनेचे पाणी लाल होते. भारताच्या दुसर्‍या कोपर्‍यात दंगली होतात. देशभर तणावग्रस्त वातावरण होते. सैन्यदल रस्त्यावर उतरवले जाते. ३ दशके त्याचे खटले चालू रहातात. अर्थातच  हिंदूंची अत्यंत दयनीय स्थिती असलेल्या पाकमधील हिंदू वरील घटनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवू शकणार नाहीत; पण भारतात बाबरीवरून रणकंदन करणारे समस्त निधर्मीवादी विचारवंत आणि माध्यमे मात्र याची नोंद घेणार नाहीत, हेही तितकेच खरे. गेली ७ दशके पाकमधील मंदिरांना अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाणे, ही धर्माभिमानी हिंदूंना नेहमीच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पाकमधील हिंदूंचा हा भयपट संपून त्यांचे निर्भय जीवन जगणे कधी चालू होणार आहे ? असा प्रश्‍न पाकमधील मोजक्या हिंदूंप्रमाणेच भारतातील सजग हिंदूंच्या मनात नेहमीच येतो. हिंदुस्थानपासूनच वेगळ्या झालेल्या पाकमध्ये शेकडो प्राचीन मंदिरे आहेत. मध्यंतरी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तेथील हिंदूंच्या आंदोलनांमुळे मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. तो ढोंगीपणाचाच एक भाग होता, हे वरील घटनेवरून सिद्ध होते. मंदिरावरील आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईवर आक्रमण करणारा आतंकवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदने हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्याविषयी वक्तव्य केले आहे. यावरून हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळून हिंदूंना डिवचण्याची आतंकवाद्यांची मानसिकता लक्षात येते.

मंदिराची तोडफोड

पाक हिंदूंवरील आक्रमणे कधी थांबणार ?

बुद्धीवाद्यांना भुलवणारे जड शब्द वापरून हिंदुत्वनिष्ठांना नेहमी ‘अतिरेक करणारे’ ठरवणारी वृत्तपत्रे यावर लेखणी उचलण्याची तसदी घेणार नाहीत. वर्ष १९९२ मध्ये बाबरी पाडल्यावर पाकमधील ३० मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. आता मात्र भारतात असे काही होणार नाही; कारण हिंदू सहिष्णु आहेत. ते सहिष्णु आहेत, हा भाग चांगला आहे; पण ते केवळ सहिष्णु नाहीत, तर ते धर्माभिमानशून्य, निष्क्रीय, असंवेदनशील, असंघटित आणि संकुचितही आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. जगातील सर्व देशांतील हिंदू भारताकडे आधारस्थान म्हणून आशेने पहातात; परंतु भारतातील बहुसंख्य हिंदूंनी मात्र त्यांना अपेक्षित असा धर्मबंधुत्वाचा हात त्यांच्यासाठी पुढे केलेला नाही. विदेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात अत्यंत कडक संदेश विदेशात गेला, तरच शत्रूला जरब बसू शकते. पाकमध्ये वर्षाला किमान १ सहस्र मुलींचे धर्मांतर होत असल्याचा आकडा आहे. हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव, छळ, हत्या, महिलांवर बलात्कार, दंगली हे तिथे गेली ७० वर्षे चालू आहेत. फाळणीच्या वेळी पाकमध्ये २२ टक्के असणारे हिंदू आज तेथे दीड टक्के शेष राहिले आहेत. तेथे राहिलेल्या हिंदूंची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. ही स्थिती पालटण्याची वाट त्यांच्याप्रमाणे भारतातील धर्मनिष्ठ हिंदूही पहात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव, आर्थिक कोंडी आणि त्याही पुढे जाऊन एकच अंतिम युद्धरूपी ‘सर्जिकल स्ट्राईक’ आता अपेक्षित आहे; जो पाकसह भारतातील हिंदूंनाही मोकळा श्‍वास देईल !