कोल्हापूर – वर्ष १९९० ते १९९५ या कालावधीत नगरसेविका म्हणून लक्षणीय आणि अनुकरणीय काम करणार्या माजी नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्या वैद्या रूपा शहा यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने झालेल्या एका सोहळ्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा सन्मान केला. या वेळी शहा यांना शाल, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यात आले.
नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे. त्याच काळात श्री महालक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या संत गाडगे महाराज चौकातील संत गाडगे महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून पुतळ्यावर छत्री बसवण्याचे काम प्राचार्या वैद्या शहा यांनी केले होते. याला २५ वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही संत गाडगे महाराज अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा.तु.भगत यांनी शहा यांना स्मरणात ठेवले. सोहळ्याच्या वेळी महापालिकेचे माजी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, कुलगुरु वैद्य डी.टी. शिर्के, अध्यासनाचे कार्याध्यक्ष एस्.एन्.पाटील, तसेच उपाध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.