कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने सिमेंटचा ५ फूट थराचा कोबा करण्यात आला आहे. यामुळे शिखरासह छताची बांधणीही धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल ‘स्ट्रक्चरल ऑडिट’मध्ये देण्यात आला आहे. हा कोबा तातडीने काढण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न करणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महेश जाधव म्हणाले, ‘‘मंदिराच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चे काम मुंबईच्या ‘स्ट्रकवेल’ आस्थापनाकडून केले जात आहे. त्यांनी ‘रडार टेस्टिंग’नंतर हा अहवाल दिला आहे. ५० वर्षांपूर्वी त्या वेळच्या लोकांना योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिरातील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केला असेल. या दगडी छतावर ५ फूट उंचीचे १ सहस्र टन कोबा- काँक्रिटीकरण केले आहे. ही स्थिती आता धोकादायक वळणावर असून तातडीने हा कोबा काढणे आवश्यक आहे.’’ हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी याविषयीची तांत्रिक माहिती घेऊन पुरातत्व विभागाकडे याचा प्रस्ताव पाठवून संमती घेऊ, असे सांगितले.
या वेळी सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, राजाराम गरुड, चारूदत्त देसाई उपस्थित होते.