पाण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

सौजन्य TV 9-मराठी

सांगली – अपुरा पाणीपुरवठा आणि पालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या पाणीदेयकाच्या निषेधार्थ सांगलीत १७ डिसेंबर या दिवशी ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील पाण्याच्या टाकीवर चढून स्थानिक नागरिक आणि सत्ताधारी नगरसेवक यांनी मिळून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीता सुतार यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आंदोलन करणार्‍यांची समजूत काढली आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. (पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी सामान्यांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)

सांगली शहरातील शामरावनगर या भागात गेल्या ६ मासांपासून अपुरा पाणीपुरवठा चालू आहे. पाण्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहेत. इतके सगळे असून पाण्याची भरमसाठ देयके स्थानिक नागरिकांना पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.